मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खासगी जागेतील कचरा उचलण्यास पालिकेने सुरुवात केली असली तरी या भागात वर्षांनुवर्षे साठलेल्या सुमारे तीन हजार टन कचऱ्याच्या ढीगाचे नेमके काय करायचे, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. शहरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावतानाच पालिकेच्या नाकीनऊ येत असताना डेब्रिज आणि संमीश्र कचऱ्याच्या या महाकाय ढीगाने समस्यांमध्ये आणखी भर टाकली आहे.  
खासगी संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या जागांमधील स्वच्छता करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची असते. मात्र हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नसल्याने अस्वच्छता पसरते. त्याचा त्रास त्या परिसरातील नागरिकांनाही होतो. यामुळे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन म्हाडा, एमएमआरडीए, बीपीटी, विमानतळ प्राधिकरण, रेल्वे परिसरातील कचरा उचलण्याची तयारी दाखवली. त्यानुसार म्हाडा, एमएमआरडीए यांच्याकडून शुल्क घेऊन पालिका त्यांच्या विभागातील कचरा उचलते. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कचराही पालिकेने उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र या भागातील कोळसा बंदर रोड आणि आजूबाजूच्या परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग पडलेले आहेत. रस्त्याच्या बांधकामाचा तसेच इतरही कचरा त्यात आहे. हा सर्व कचरा सुमारे तीन हजार मेट्रिक टन आहे. हा कचरा वर्षांनुवर्षे पडून आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात या कचऱ्यासंबंधी पालिकेने मुंबई पोर्ट ट्रस्टकडे विचारणा केली होती व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र एवढय़ा कचऱ्याचे नेमके काय करायचे त्याबाबत पोर्ट ट्रस्टचे अधिकारीही संभ्रमात आहेत. त्यामुळे त्यांनी पालिकेलाच विनंती करून कचरा उचलण्यास सांगितले. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हा कचरा उचलण्यास महानगरपालिका तयारही होईल. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न आहे, असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई शहर व उपनगरात मिळून रोज साधारण साडेसहा ते सात हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. मुलुंड, देवनार तसेच कांजूर डम्पिंग ग्राऊंडमध्ये हा कचरा टाकतानाच पालिकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या पाश्र्वभूमीवर एवढा कचरा उचलण्याची व तो टाकण्याची जबाबदारी घेण्याबाबत पालिकेसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
शुक्रवार, ७ मार्च रोजी घनकचरा विभागाचे उपमुख्य अभियंता अशोक यमगार यांनी पोर्ट ट्रस्टमधील कचऱ्याच्या ढीगांची पाहणी केली. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिका पुन्हा पोर्ट ट्रस्टला नोटीस पाठवून कचरा विल्हेवाटीबाबत निर्णय घेण्यास सांगणार आहे. खड्डे बुजवण्यासाठी किंवा मोठय़ा प्रमाणावर जमिनीवर भराव टाकण्यासाठी हा कचरा वापरता येईल का याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे खाजगी संस्थांमधील कचरा उचण्यासाठी पालिका पुढाकार घेते. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कचरा उचलण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात त्यांना नोटीस पाठविली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी दिली.

Story img Loader