इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने ५ ठिकाणी प्रकल्प राबविण्यात आले असून त्याला नागरिकांकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे. प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन शहराच्या अन्य भागातही मोठय़ा प्रमाणात नवे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच शहरवासीयांना दररोज पुरेसा पाणी पुरवठा व्हावा याचेही नियोजन केले जात आहे, असे मत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी नगरसेवकांच्या बठकीत व्यक्त केले.
इचलकरंजी शहरात गेले काही दिवस पाण्याच्या प्रश्नावरुन नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिकेत मोर्चा, निवेदन, रास्तारोको या माध्यमातून लोक आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. या पाश्र्वभूमीवर शहराचा पाणी पुरवठा पुरेसा, सुरळीत व नियमित व्हावा या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बठक मंगळवारी सायंकाळी शहर काँग्रेस भवनात आयोजित केली होती. या बठकीत शुध्द पाणी पुरवठा प्रकल्पाची व्याप्ती वाढविणे, तसेच शहराचा पाणी पुरवठा नियमित करणे अशा दुहेरी पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव आरगे, नगराध्यक्षा सौ. सुप्रिया गोंदकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, पक्षप्रतोद सुनील पाटील, पाणी पुरवठा सभापती अब्राहम आवळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
शहरातील पाणी पुरवठय़ाची स्थिती, नागरिकांचे मनोगत, प्रशासनाची कामकाज पध्दती, पाणी पुरवठय़ात सुधारणा होण्यासाठी उपाययोजना आदी विविध मुद्यांवर नगरसेवकांनी आपली भूमिका मांडली. नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी पाणी पुरवठय़ामध्ये सुधारणा करण्याबाबतचे विवेचन केले. ते म्हणाले,‘‘इचलकरंजी नगरपालिकेने शहरात योग्य व पुरेसा पाणी पुरवठा होण्याकडे सतर्कतेने लक्ष दिले पाहिजे. पाणी उपसाच्या ठिकाणी मोटारींची दुरुस्ती, गळती प्राधान्याने दुरुस्त करणे, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे लक्ष या माध्यमातून पाणी नियोजन पूर्ववत व नेटके करणे शक्य आहे.’’
गतवर्षी काविळीची साथ उद्भवल्यानंतर शहरात शुध्द पाणी मिळण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या माध्यमातून ५ ठिकाणी मिनरल वॉटर धर्तीवर प्रकल्प राबविण्यात आले. अतिशय कमी किं मतीत शुध्द पाणी नागरिकांना मिळू लागल्याने त्याचे शहरात स्वागत होत आहे असा उल्लेख करुन आवाडे म्हणाले, या शुध्द पाणी प्रकल्पाला नागरिकांचा मिळणारा भरभरुन प्रतिसाद लक्षात घेऊन शहराच्या अन्य भागातही त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे. पंचगंगा नदीचे पाणी प्रवाहित रहावे यासाठी गतवर्षी केलेल्या प्रयत्नांना यश आले होते. सध्या या कामाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने राज्य पातळीवर प्रयत्न करुन पाणी प्रवाहित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनीही पाण्याची स्थिती विचारात घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader