जेईई, एमएच-सीईटी आदी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अकरावीला प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाला रामराम ठोकून बारावीकरिता इतर ‘टायअप’वाल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मुंबईत वाढू लागली असून त्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालये यांच्यात निराळाच संघर्ष उभा राहू लागला आहे.
‘टायअप’ संस्कृतीने मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयीन वातावरणच पार बदलून टाकले आहे. अकरावीला विशेषत: विज्ञान शाखेला मनाजोग्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला की भरून पावलो, अशी काहीशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात असायची. पण, आता सीईटीची तयारी करता यावी म्हणून मोठे नाव असलेल्या महाविद्यालयाला रामराम ठोकून बारावीकरिता इतर टायअपवाल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.
अकरावीला झालेले प्रवेश बारावीला मोठय़ा संख्येने रद्द झाल्यास त्याचा फटका बारावीच्या अनुदानित तुकडय़ा आणि पर्यायाने शिक्षकांना बसण्याचा धोका आहे. यामुळे अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांचे प्रवेश सहजासहजी रद्द करण्यास तयार नाहीत. ‘एकदम २० ते ४० विद्यार्थी प्रवेश सोडून गेल्यास त्याचा परिणाम बारावीच्या तुकडय़ा कमी होण्यात होतो. तुकडय़ा कमी झाल्या की शिक्षक अतिरिक्त ठरतो. मग त्या शिक्षकाला आम्हाला कायमचे मुकावे लागते. म्हणून आम्ही एखाद्या मुलाचे अगदीच तातडीचे कारण असेल तरच प्रवेश रद्द करतो,’ असे अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
‘आतापर्यंत घर बदलले, घरापासून महाविद्यालयापर्यंतचा प्रवास झेपणार नाही अशा तातडीच्या कारणांसाठी आम्ही सुमारे २० विद्यार्थ्यांचे बारावीचे प्रवेश रद्द केले आहेत. परंतु, आणखी १० ते १२ विद्यार्थी प्रवेश रद्द करण्याची मागणी करीत आहेत. परंतु, त्यांचे कारण आम्हाला तातडीचे वाटत नसल्याने आम्ही त्यांचे प्रवेश रद्द केलेले नाहीत,’ अशी माहिती त्यांनी दिली. कारण, एकदम ३० ते ४० विद्यार्थी कमी झाले तर आमचे काही शिक्षक कमी होण्याची शक्यता आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अर्थात प्रवेश रद्द झाल्याने रिक्त राहिलेल्या जागा भरण्यातही अडचणी आहेत. कारण, जे बारावीला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याच्या इच्छेने अर्ज करतात त्यांना त्यांचे मूळ महाविद्यालय सोडण्यास तयार होत नाही. आताही आमच्याकडे असे २० अर्ज आले आहेत. पण, त्यापैकी १० जणांना त्यांची महाविद्यालये सोडण्यास तयार नाहीत, अशी माहिती त्यांनी पुरविली.
भवन्स महाविद्यालयासारखी परिस्थिती मुंबईतील इतरही काही महाविद्यालयांची आहे. अर्थात यात विद्यार्थ्यांनाही दोष देऊन चालणार नाही. अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून घराजवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. मग त्यांना महाविद्यालयांनी का जबरीने आपल्याच महाविद्यालयात थांबवून ठेवावे, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांच्या पालकाने केला आहे.