वाघांची तहान भागवण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर झोन मिळून शंभर हंगामी पानवठे बांधण्यात आले आहेत, तर टॅंकरमुक्त पाणी पुरवठय़ासाठी मोहुर्ली व पळसगाव येो सोलार पंप बसवण्यात आल्याने यावर्षी वाघोबांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार नाही.
अत्यल्प पावसामुळे यावर्षी या जिल्ह्य़ातील ४५० गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. इरई धरणासह जिल्ह्य़ातील छोटे मोठे सिंचन प्रकल्प, मामा तलाव, गाव तलाव, हातपंप, टय़ुबवेलची पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. भद्रावती, वरोरा, चिमूर व चंद्रपूर या चार तालुक्यांमध्ये तर भूगर्भातील पाणी पातळी दिड ते दोन मीटरने खोल गेली आहे. याचा सर्वाधिक फटका ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला बसण्याची शक्यता लक्षात घेता ताडोबा व्यवसापनाने उन्हाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच कोअर व बफर झोन मिळून शंभर हंगामी पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ताडोबा प्रकल्पातील वाघ व इतर वन्यप्राण्यांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार नाही. ताडोबा, मोहर्ली व कोळसा, अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागल्या गेलेल्या प्रकल्पात सात उपक्षेत्र व ३४ नियतक्षेत्रे आहेत. प्रकल्पातील वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता छोटे मोठे मिळून आठ तलाव आहेत. यात ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्वाचे तलाव आहेत.
दरवर्षी १ मार्चपासून उन्हाळ्याला सुरुवात होताच या तलावातील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. यावर्षीची परिसिती लक्षात घेता डिसेंबर व जानेवारीतच हंगामी बंधाऱ्यांची कामे हातात घेण्यात आली. त्याचा परिणाम फेब्रुवारी व मार्च महिन्यात ताडोबातील पानवठे तुडूंब भरलेली आहेत. अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी र्आातच, ‘लाईफ लाईन ऑफ ताडोबा’ असे म्हटले जाते. खातोडा गेटजवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मसान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पानवठय़ांचे मुख्य उगमसान आहे. डिसेंबरमध्ये बंधारे तयार केल्याने यंदा मार्च महिन्यातही या नदीला चांगले पाणी आहे. अंधारी नदीच्या प्रवाहातील वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम पानवठे तुडूंब आहेत. या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नाले सुध्दा आहेत. यात उपाशानाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर्षी यात चांगले पाणी दिसून येत आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हे वॉटर होल फेब्रुवारीतच कोरडे पडतात, मात्र यातही काही प्रमाणात पाणी आहे.
ताडोबा आणि कोळसा या दोन मोठय़ा तलावात मोठय़ा प्रमाणात पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ताडोबाला पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. दरवर्षी १ मार्चपासूनच प्रकल्पात टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो, परंतु यंदा ७० बंधाऱ्यांची कामे हाती घेतल्याने परिसिती अतिशय चांगली असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनचे उपवनसंरक्षक डोडल यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. ताडोबा व्यवसापनाने तयार केलेल्या शंभर सिमेंट बंधाऱ्यात व नैसर्गिक बंधाऱ्यात या टॅंकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी गेल्या वर्षी मोहुर्ली येो दोन टॅंकर लावण्यात आले होते, परंतु यंदा टॅंकरमुक्त पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात आला असल्याने मोहुर्ली व पळसगांव येो दोन सोलार पंप बसविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ कोअर झोनमध्येच नाही, तर बफर झोनमध्ये २९ पानवठे तयार करण्यात आलेले आहेत. या सर्व पानवठय़ांमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. साधारणत: १५ मार्चपासून तीव्र पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे बफर झोनमध्ये एक ते दोन टॅंकर लावण्याचा प्रस्ताव आहे. शंभर हंगामी बंधाऱ्यांसोबतच सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. येत्या दहा तारखेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास ताडोबा व्यवसापनाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्य़ातील ४५० गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असला तरी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघोबांना यंदाच्या उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळणार असल्याचे डोडल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा