रणरणत्या उन्हाच्या तीव्रतेने घनदाट जंगलात दडून बसलेला वाघ मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व परिसरात पट्टेदार वाघ मुक्त संचार करीत असतांनाचे चित्र येथे बघायला मिळत आहे. वाघ दर्शन देत असल्यानेच पर्यटकांनी गर्दी केली आहे.
वाघांच्या वास्तव्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जगाच्या पातळीवर प्रसिध्दीस आला आहे. ६२५.०४ चौ.कि.मी क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ आहे. ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागल्या गेलेल्या या प्रकल्पात सात उपक्षेत्र व ३४ नियतक्षेत्रे आहेत. या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण पट्टेदार वाघ असून व्याघ्रगणनेच्या नोंदीनुसार ५० वाघांचे व २२ बिबटय़ांचे वास्तव्य येथे आहे. ताडोबाचा राजा जरी वाघ असला तरी येथे इतर वन्यजीवांची चांगलीच भरमार आहे. अस्वल, कांचनमृग-चितळ, सांबर, रानगवा, रानडुक्कर, निलगाय, रानकुत्रे, काकर, चौशिंगा, असे ४५ जातींचे वन्यप्राणी या प्रकल्पात वास्तव्याला आहेत. याशिवाय, उदमांजर, चांदी अस्वल, उडणारी खार, राजमांजर, तीन हत्ती व शंभरावर मगरी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० व २८३ जातींचे पक्षी त्याशिवाय, २६ प्रकारचे कोळी, २३ जातीचे मासे, ९४ प्रकारची रंगबेरंगी फुलपाखरांसोबत संरक्षित वनात साग, बांबू, मोहा, जांभूळ, शिसम आदि ६६ वृक्षांच्या प्रजाती येथे आहेत. झुडपांच्या २३, तर वेलींच्या ११ जाती येथे आहेत. बांबूसह २६ जातींचे गवत या प्रकल्पात आहे.
निसर्गाच्या कोंदणातील हिरा असलेल्या ताडोबात १८५ मचाणी, १७५ गुंफा, सात तलाव आहेत. या प्रकल्पातील कोळसा, बोटेझरी, पळसगाव, रानतळोधी, जामनी, नवेगाव या सहा गावांपैकी कोळसा, बोटेझरी व पळसगाव या तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. निसर्ग सौंदर्य व वन्यप्राण्यांच्या निरीक्षणाकरिता सुमारे लाखो पर्यटक दरवर्षी या प्रकल्पाला भेट देतात. यंदाही कडक उन्हाळ्याला सुरुवात होताच एप्रिलमधील सुटय़ा व विकएंड बघता पर्यटकांनी ताडोबात गर्दी केली आहे. थंडीमुळे घनदाट जंगलात दडून बसलेला पट्टेदार वाघ आता एप्रिल व मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जंगलातून बाहेर पडला आहे. सध्या पट्टेदार वाघ ताडोबा व परिसरात पर्यटकांना मनसोक्त दर्शन देत आहे. मोहफुलांचा मोसम सुरू झाल्याने ताडोबालगतचे गावकरी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी जातात. बहुतांश गावकऱ्यांना वाघाचे दर्शन झालेले आहे. मोहफुले वेचण्यात गुंग असलेल्या दोघांचा तर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ताडोबातील पानवठे, तसेच सकाळच्या वेळी मुख्य रस्त्यांनी मुक्त संचार करीत असतांना वाघोबा दिसत आहे. दुपारी आराम केल्यानंतर पुन्हा सायंकाळी सावजाच्या शोधात वाघ संचार करीत असतांनाचे चित्र ताडोबात बघायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा