मिहान परिसरात आज बिबट शिरल्याच्या घटनेने दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हिंस्र प्राणी शहरी भागात शिरण्याच्या घटनांत वाढ झाल्याने वन खाते हादरले आहे. मोठय़ा प्रकल्पांमुळे जंगलांमधील कॉरिडॉर्स नष्ट होऊ लागल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांच्या दिशेने भटकत आहेत. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतक ऱ्याचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे ताडोबा-अंधारी परिसरातही दहशतीचे वातावरण आहे. बुटीबोरी परिसरातही काही दिवसांपूर्वी पट्टेदार वाघ दिसला होता. आज मिहान परिसरात बिबटय़ा दिसल्याचे कळताच त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत बिबटय़ाचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. त्यामुळे शोधमोहीम रात्रीपुरती थांबविण्यात आली.  
काही दिवसांपूर्वी बेसा परिसरात अस्वलाचे दर्शन घडले होते. भीमनगर वस्तीत अस्वल दिसल्याचे रहिवाशांनी सांगितल्यानंतर वन विभागातर्फे शोध घेण्यात आला. मात्र, अस्वलाने नंतर कुठेतरी दडी मारली. कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, ते कुठेही आढळून आले नाही.
आजही मिहान परिसरात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक बिबट दिसल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. सोनेगाव पोलिसांना याची सूचना मिळाल्यानंतर सेमिनरी हिल्स वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक नंदनवार यांनी गुणवंत खरवडे यांच्या नेतृत्त्वातील वन विभागाचे पथक बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी पाठविले.
थंडीचे दिवस असल्याने सायंकाळी सहा वाजतापासून या भागात अंधार झाला. त्यामुळे बिबटय़ा कुठे दडला आहे, याचा कोणताही अंदाज या पथकाला येऊ शकला नाही. परिणामी शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत असल्याने बिबटय़ांना जंगलाबाहेर पलायनाची वेळ आली असावी, असा दावा उपवनसंरक्षक पी.के. महाजन यांनी केला. बोर अभयारण्य मिहान परिसराला लागून असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा शिरकाव सहजशक्य आहे. बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी सरकारी पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
बोर अभयारण्यात गेल्या काही वर्षांमध्ये पट्टेदार वाघांची संख्या वाढू लागली आहे. राज्यभर सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांमुळे जंगलातील कॉरिडॉर्स नष्ट झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यास थेट मानवी वस्तीकडे धाव घेतात.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा