‘होली के दिन.. ’ म्हणत मद्यप्राशनासह गोंधळ घालणार असाल तर सावधान.. नजर जाईल तेथे पोलीस तैनात राहणार असून ते गोंधळ घालणाऱ्यांना थेट गजाआड घालतील. होळी आणि धुळवड पाहता नागपूर शहरात सहा हजारावर तर ग्रामीण भागात चार हजारावर पोलीस गुरुवार सायंकाळपासून तैनात करण्यात आले आहेत.
होळी व धुलीवंदन हा जुने वैमनस्य विसरून प्रेमभाव जपण्याचा सण. पण गेल्या काही दिवसात मद्याच्या आहारी गेलेल्यांनी या सणाचे रूपच पालटून टाकले आहे. मद्यप्राशन तसेच नशेत धुंद राहून शांतता भंग करण्याचे प्रकार सर्रास वाढीस लागले आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. उद्या शहरात किमान ५५० होळ्या पेटणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नागपूर शहरात शिघ्र कृती पथक तसेच गृहरक्षकांसह एकूण सहा हजाराहून अधिक पोलीस गुरुवार सायंकाळपासून तैनात करण्यात आले आहेत. शहरात ५० फिक्स  पॉइंट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पॉइंटवर प्रत्येकी एका उपनिरीक्षकासह पाचजणांचे सशस्त्र पथक तैनात राहील. अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याजवळ राहतील. राज्य राखीव पोलीस दलाच्या २ कंपन्यांसह नियंत्रण कक्षात राखीव ताफा सज्ज राहील. साडेचारशे गृहरक्षक शहरात आहेत. १५ जणांचा स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आला आहे. असे १० फोर्स विविध ठिकाणी तैनात राहतील.
पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त हे बंदोबस्तावर नियंत्रण ठेवणार आहेत. बंदोबस्तात केवळ शिपाईच राहणार नसून पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील वरिष्ठ अधिकारी सतत शहरात फिरणार आहेत. दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त व सहा उपायुक्त या सर्वाजवळ स्ट्रायकिंग फोर्स राहील. अप्रिय घटना घडल्यास अवघ्या काही मिनिटात तेथे पोहोचता येईल, अशा जागी ते राहतील. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान सात गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. ठाण्यात मोजक्याच शिपायांना राहण्यास सांगण्यात आले असून इतर सर्व फिक्स पॉइंट अथवा गस्ती पथकात राहतील. मोठी घटना घडल्यास स्ट्रायकिंग फोर्स तेथे पोहोचून कारवाई करेल. तेथे प्रत्येकी दोन शिपाई तैनात राहतील. शहरात वीसहून संवेदनशिल, दहाहून अधिक अतिसंवेदनशिल वस्त्या व धार्मिक स्थळे असून तेथे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. संवेदनशिल वस्ती, प्रत्येक धार्मिक स्थळ तसेच चौरस्ता या ठिकाणी दर पाच मिनिटांनी गस्ती पथके जातील, अशा रितीने त्यांचे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी सुमारे साडेचारशे वाहतूक पोलीस तैनात राहणार असून ते श्वास विश्लेषकाने वाहन चालकांची तपासणी करतील. प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केलेल्या तसेच वेगात वाहन चालविणाऱ्या आणि ट्रिपल सिट वाहन चालकांवर ते कारवाई करतील.
मद्यप्राशनासह गोंधळ घालणाऱ्यांची रवानगी थेट गजाआड होईल, असा इशाराही पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांनी दिला आहे.

Story img Loader