पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकृत दौरा आला नसल्याचे पोलीस व प्रशासकीय अधिकारी सांगत असले तरी त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून मौदा व नागपुरात एसपीजीसह दहा हजारांहून अधिक पोलिसांची कडेकोट सुरक्षा राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ तारखेला दुपारी दीड वाजताच्या सुमारास रांचीहून विशेष विमानाने निघतील तेव्हा नागपूर ते राची मार्ग सील केला जाईल. यावेळी कुठलेही विमान आकाशात झेपावणार नाही. तीन वाजताच्या सुमारास त्यांचे नागपूरला विमानतळावर आगमन होईल. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पीयूश गोयल त्यांच्यासोबत राहतील. राज्यपाल के. शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे इतर वरिष्ठ अधिकारी त्यांचे स्वागत करतील. तेथून लगेचच ही सर्व मंडळी हेलिकॉप्टरने मौदा येथे रवाना होतील. लष्कराची चार हेलिकॉप्टर त्यासाठी येणार आहेत. मौदा येथून ४.५० वाजता ते नागपूर विमानमतळावर पोहोचतील. तेथून कस्तुरचंद पार्कवर जातील सभा आटोपून ते सायंकाळी साडेसहा वाजता विमानतळावर परत जातील.
या संपूर्ण दौऱ्यात दहा हजाराहून अधिक पोलीस तैनात राहतील. पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे पथक नागपुरात डेरेदाखल झाले आहे. या पथकाच्या अधिकाऱ्यांनी मौदा तसेच कस्तुरचंद पार्कची पहाणी केली. दुपारी विमानतळावर त्यांनी वरिष्ठ पोलीस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधानांची वाहने दिल्लीहून येणार आहेत. विमानतळ ते कस्तुरचंद ते कुठल्या रस्त्याने जातील, हे निश्चित झालेले नाही. मात्र, त्यांच्या या मार्गात रस्त्याच्या दुत0र्फा दर पावलांवर, इमारतींवर सशस्त्र पोलीस तैनात राहतील. त्यांच्या वाहनांचा काफिला येण्याच्या केवळ काही मिनिटे आधी या मार्गाला येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातील. कस्तुरचंद पार्क व मौदा येथील कार्यक्रमात प्रवेशपत्राशिवाय कुणालाच प्रवेश दिला जाणार नाही. व्यासपीठावर बसणाऱ्यापासून ते त्या परिसरात असलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत तसेच विमानतळापासून ते व्यासपीठापर्यंत सुरक्षा तसेच व्यवस्थेसाठी तैनात सर्वानाच प्रवेशपत्र अत्यावश्यक राहणार आहे. काम असेल त्यालाच आणि गुप्त चौकशी झाल्यानंतरच प्रवेशपत्र दिले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी धातूशधक यंत्राने तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. पंतप्रधानांना चारस्तरीय सुरक्षेचे कडे राहणार आहेत. एसपीजी जवानच ते सांभाळतील. त्यानंतर राज्य पोलिसांची सुरक्षा राहणार आहे. त्यासाठी पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही नागपुरात येणार आहेत. केंद्रीय गुप्तचर खाते तसेच सर्वच गुप्तचर यंत्रणा याआधीच सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्यासह गुप्तचर कानोसा घेत आहेत. शहर व ग्रामीण पोलिसांनी समाजकंटकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या काही दिवसात पंधराहाहून अधिक गुंडांवर कारवाई केली असून देशी कट्टेही जप्त केले आहेत. केंद्रीय सुरक्षा दले, रेल्वे पोलीस, आरपीएफ, सीआयडी आदी इतर सुरक्षा यंत्रणाही अप्रत्यक्षरित्या लक्ष ठेवून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा