‘एक तीळ प्रेमाचा म्हणून वाटून घ्यावा, सातजणांनी खावा’ अशी संस्कृती विकसित व्हावी म्हणून संक्रांतीत तिळाला महत्त्व आहे. पण आता ‘एक तीळ महागाईचा म्हणून तो वाटून खावा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या ठोक बाजारात दीड हजार रुपये क्विंटल दराने विकला जाणारा तीळ किरकोळ बाजारात २०० रुपये किलोपर्यंत वधारला आहे. याच वेळी गूळ तर एवढा महाग आहे की, त्या पुढे साखर फिकी पडावी. सध्या गूळ ठोक बाजारात ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. त्यामुळे आता तीळ व गूळ ‘व्हॉटस्अप’वर पाठविण्याशिवाय पर्याय तो काय असेल? असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून तिळाचा पेरा दिवसेंदिवस कमी होत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत तिळाचे भाव चांगलेच वाढतात. गतवर्षी १ हजार रुपये क्विंटल दराने विकला गेलेला तीळ, या वर्षी ठोक १५०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात १८० रुपये प्रतिकिलो द्यावे लागत आहेत. तिळाची उत्पादकता मुळात कमी, पाऊसही बेताचाच हवा. राशीच्या वेळी अडचणी. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून शेतकरी या पिकापासून दूर जात आहे. पूर्वी घरी खाण्यापुरता तरी तीळ पेरण्याची पद्धत होती. मात्र, असे वर्षांकाठी लागणारे पदार्थ विकत घेतलेले परवडतात, हे लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यात जास्त नफा तेच पीक घेण्यास सुरुवात केली. गेल्या ४-५ वर्षांत तिळाच्या किमती दरवर्षी झपाटय़ाने वाढत आहेत.
लातूरच्या रेणापूर, जळकोट भागात काही प्रमाणात तिळाचे पीक घेतले जाते. कर्नाटकातूनही तिळाची आवक होते. गेले महिनाभर तिळाची आवक रोज २०० क्विंटलच्या आसपास होती. आता ती चांगलीच मंदावली. ५० क्विंटलपेक्षाही ती कमी झाली आहे. संक्रांतीच्या सणानिमित्ताने तिळाची बाजारपेठेत खरेदी होत आहे. सध्या तिळाचे भाव १३०० ते १५००च्या आसपास आहेत.
तिळाबरोबरच संक्रांतीनिमित्त घरात गुळाची खरेदी केली जाते. या वर्षी साखरेचे व गुळाचे भाव बरोबरीत आहेत. बाजारपेठेत सध्या गुळाची दररोज १० ते १२ हजार क्विंटल आवक आहे. लातूर बाजारपेठेतील गुळाला चांगला भाव मिळतो, मागणीही चांगली आहे. बाजारात येणारा ८० टक्के गुळ हलक्या व मध्यम गुणवत्तेचा असतो. २० टक्के गुळ चांगल्या गुणवत्तेचा असतो. घरगुती खाण्यासाठी थोडा महाग असला तरी चालेल, चांगला गुळ प्रत्येकालाच हवा असतो. मागणी अधिक व पुरवठा कमी यामुळे चांगल्या गुळाचे भाव ३० रुपये किलोपर्यंत आहेत, जे साखरेपेक्षाही अधिक आहेत. साखरेचा ग्राहक व गुळाचा ग्राहक हा भिन्न आहे. गुळ महागला म्हणून साखर खाणारे व साखर महागली म्हणून गुळ खाणारे असे लोक फार कमी आहेत. गुळाचा अधिक वापर देशी दारू तयार करण्यासाठी केला जातो. तयार साखरेपासून देशी दारू तयार होत नाही. त्याला हलक्या प्रतीचाच गुळ लागतो, त्यामुळे अशा गुळासही मोठी मागणी आहे.
तीळ व गुळ एकत्र करून लाडू, रेवडय़ा आदी पदार्थ तयार करून विकले जातात. तिळापासून हलवा, पापडी तयार करून ते बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्रीस दाखल झाले आहेत. सुटे तीळ व गुळ एकत्र करून वाटणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. थंडीत तीळ व गुळ दोन्ही गुणकारी आहेत. तिळातील स्निग्धांश, उष्मांक, प्रोटीन्स शरीराला उपयोगी आहे, तर गुळातील लोह शरीराला पोषक आहे. या कारणांमुळेच संक्रांतीनिमित्ताने तिळगुळ देण्याची प्रथा सुरू झाली असावी. प्रत्येक बाबतीत महागाई गगनाला भिडत असल्यामुळे आता तिळगुळही व्हॉटस्अपवर पाठवण्यातच लोक आनंद घेतील, असे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा