‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून संबोधले गेलेले दिग्दर्शक यश चोप्रा यांचा हा शेवटचा चित्रपट. अस्सल यश चोप्रा पद्धतीचे प्रेम पडद्यावर दाखविणारा हा चित्रपट. यश चोप्रा-शाहरूख खान यांचे जुळलेले सूर यातून साकारलेला हा चित्रपट असून बऱ्याच कालावधीनंतर शाहरूख खानने प्रियकर रंगविला आहे. कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या दोन नायिकांपेक्षा शाहरूख खानचा चित्रपट म्हणूनच या चित्रपटाची गणना करावी लागेल. शाहरूख खान बऱ्याच कालावधीनंतर ‘राज मल्होत्रा’ची भूमिका यातून साकारतोय. शाहरूख खानच्या चाहत्या प्रेक्षकांसाठीच जणू यश चोप्रांनी बनविलेला चित्रपट म्हणता येईल. तत्त्वज्ञान, काव्यमय प्रेम, यश चोप्रा स्टाइलचे थोडे मागच्या काळात पडद्यावर आलेले नायक-नायिकेचे प्रेम दिग्दर्शकाने या चित्रपटातून दाखविले आहे.
समर आनंद अर्थात शाहरूख हा लंडनमध्ये मिळेल ते काम करून पोट भरणारा तरुण. लंडनच्या रस्त्यांवर उभे राहून कधी गिटार वाजवून गाणी गात पैसे मिळवायचे तर कधी चर्चबाहेर जमलेले बर्फ गोळा करून रस्ते साफ करायचे. कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे तर कधी सुपरमार्केटला वस्तू पोहोचविण्याचे काम करून उपजीविका करणारा समर आनंद म्हणे आपल्या बाबा-काकांप्रमाणे लष्करात जायचे नाही म्हणून लंडनला जातो. तिथे त्याला गिटार वाजविता वाजविता मीरा थापर (कतरिना कैफ) दिसते आणि पाहताक्षणी तो भारावून जातो. मीराच्या साखरपुडय़ाच्या पार्टीत तो वेटर म्हणून तिला भेटतो. अस्सल पंजाबी बोलणाऱ्या समरकडून पंजाबी गाणे शिकायचे आणि वडिलांना म्हणजे अनुपम खेरना आश्चर्याचा धक्का द्यायचा असे मीरा ठरविते. त्यानिमित्ताने भेटीगाठी वाढत जातात आणि केवळ वडिलांची इच्छा म्हणून रॉजरशी लग्न करावे लागतेय, नाहीतर तुझ्याशी लग्न केले असते. चर्चमध्ये जाऊन चुकांची कबुली देणे, हवे ते मागणे आणि त्या बदल्यात काही गोष्टी कायमच्या सोडण्याची प्रतिज्ञा घेणे असा मीराचा शिरस्ता आहे. अशाच एका प्रतिज्ञेमुळे ती समरला सोडून जाते आणि मग अस्वस्थ झालेला समर आनंद लंडन सोडून थेट भारतीय लष्करात दाखल होतो. लष्करात अचानक त्याला अकिरा (अनुष्का शर्मा) भेटते. अकिरा त्याच्या प्रेमात पडते. डिस्कव्हरी चॅनलसाठी समर आनंदवर ती माहितीपट बनविते आणि त्यासाठी समरला लंडनला बोलावते. पुन्हा लंडनला जाण्याची इच्छा नसूनही समर आनंद लंडनला येतो आणि दहा वर्षांपूर्वीचे मीराचे प्रेम, दहा वर्षांनंतरचे अकिराचे प्रेम यांची जुगलबंदी होते.
यश चोप्रा दिग्दर्शित शाहरूखचा चित्रपट असे सरळसोट वर्णन या चित्रपटाचे करता येईल. त्यामुळे लंडनमधील भारतीय आणि गर्भश्रीमंत तरुणी एका वेटरच्या प्रेमात कशी पडू शकते, एक वेटर थेट भारतीय लष्करात अधिकारी कसा बनू शकतो, बॉम्ब निकामी करण्याच्या पथकाचा प्रमुख म्हणून गणला गेलेला मेजर समर आनंद इतका बुद्धिमान असतो तर लंडनमध्ये वेटर म्हणून का काम करतो यासारखे प्रश्न यश चोप्राकृत चित्रपटाच्या बाबतीत उपस्थित करू नयेत. रोमॅण्टिक चित्रपट ही त्यांची खासियत होती. आपल्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही प्रेक्षकांनी लंडनचे नेत्रसुखद चित्रण पाहावे, त्याचबरोबर काश्मीरचे सौंदर्य पाहावे हीच अपेक्षा आहे.
दोन नायिका एक नायक यांचा प्रेमत्रिकोण फॉम्र्युला असेल असे प्रेक्षकाला वाटू शकते. परंतु, त्या फॉम्र्युलाला संपूर्ण फाटा देत, दोन नायिकांची स्पर्धा टाळत दिग्दर्शकाने चित्रपटात वेगळ्याच पद्धतीचा रोमान्स पडद्यावर आणलाय. अतिशय परिपक्व प्रेमकथा साकारली आहे. अर्थात नायिकेच्या आठवणीने आठ-दहा वर्षांनंतरही लष्करात अधिकारीपदावर पोहोचलेला नायक लेहच्या नदीकिनारी जाऊन बसतो आणि गाणे गातो हे पचनी पडणारे नसले तरी शाहरूख आहे म्हणून प्रेक्षक ते सहज स्वीकारतो. शाहरूखने साकारलेला रोमॅण्टिक नायक जुना वाटत नाही. दोन अपघातांचा योगायोग, त्यानंतर नायकाची स्मृती जाण्याचा योगायोग वगैरे प्रेमकथेतले ठरीव थांबे मात्र यात आहेत. थोडा जुना फॉम्र्युला आणि काव्यमय प्रेमाचे सादरीकरण दाखवून यश चोप्रांनी या चित्रपटातूनही प्रेम हा विषय हाताळला असला तरी पूर्वीच्या त्यांच्या सर्व चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे.
मीरा-समर आनंदचे प्रेम दाखविण्याबरोबरच पटकथेत जोडलेले दुवे म्हणजे मीराची आई पूजा (नीतू सिंग), पूजा-मीराची भेट, संवादातून आपल्या कुटुंबातील प्रत्येकजण लष्करात नोकरीला होता हे समर आनंद सांगतो. नंतर लंडन सोडून तोही लष्करात दाखल होतो असा तर्कसुसंगतपणा दाखविण्याचा प्रयत्न पटकथेत केला आहे. त्यामुळे चित्रपट एक वर्तुळ पूर्ण करतो.
अभिनयाच्या बाबतीत अनुष्काने साकारलेली अकिरा, तिचा बिनधास्त स्वभाव प्रेक्षकाला आवडून जातो. कतरिनाने साकारलेली मीराही आवडते. कतरिनाचे सौंदर्य हाच तिचा ‘प्लस पॉइंट’ आहे. किंबहुना अभिनयाचा विचार केला तर कतरिनाचा आतापर्यंत तिने केलेल्या चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनय या चित्रपटात आहे असे म्हणता येईल. खासकरून तिने मीरा संयतपणे साकारण्याचा केलेला प्रयत्न आणि अनुष्काने साकारलेली आजची बेधडक, ‘हॅपी गो लकी’ तरुणी या मिश्रणामुळे चित्रपटात दोघीही उठून दिसतात. शाहरूख खान पडदा व्यापून राहतोच. यश चोप्रा छापाचा हा चित्रपट असल्यामुळे ‘जब तक है शाहरूख खान तब तक है प्रेक्षक’ असेच म्हणायला हरकत नाही.
चित्रपटाची प्रचंड लांबी यामुळे प्रेक्षक कंटाळतो हेही खरेच. रोमॅण्टिक चित्रपट हा जसा यश चोप्रांचा हातखंडा तसेच गाणी आणि त्याचे चित्रीकरण हाही त्यांचा विशेष. परंतु, जिया रे जिया हे अनुष्का शर्मावर चित्रित झालेले गाणे आणि मीरा समर आनंदला ‘आय लव्ह यू’ म्हणते तेव्हाचे गाणे अशी दोन गाणी सोडली तर ए. आर. रहेमानचे संगीत फारसा प्रभाव पाडू शकत नाही.
यशराज फिल्म्स प्रस्तुत
जब तक है जान
निर्माता – आदित्य चोप्रा
दिग्दर्शक – यश चोप्रा
पटकथा – देविका भगत, आदित्य चोप्रा
कथा – आदित्य चोप्रा
छायालेखन – अनिल मेहता
संकलन – नम्रता राव
संगीत – ए. आर. रहेमान
गीते – गुलजार
कलावंत – शाहरूख खान, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अनुपम खेर, ऋषी कपूर, नीतू सिंग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा