टिटवाळा शहराच्या चोहोबाजूने मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी पालिकेच्या परवानग्या घेऊन अधिकृत बांधकामेही सुरू आहेत. या सर्व ठिकाणी पाण्याचा वापर होत आहे. अनेक दिवस तुंबून राहत असलेल्या सांडपाण्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, टिटवाळा भागात मोठय़ा प्रमाणात ताप, थंडी, मलेरिया, सर्दी आणि काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अखत्यारीत हा भाग येतो. पालिकेचे या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी केली आहे. पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी टिटवाळ्यातील रहिवाशांचा मोर्चा पालिकेवर आणला होता. शहरातील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. टिटवाळा गाव, परिसरातील डोंगर, मोकळ्या जमिनींवर भूमाफियांनी चाळी, इमारती बांधण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या अनधिकृत वस्त्यांमध्ये चोरून वीज, पाणीपुरवठा होत आहे. पिण्यासाठी खड्डय़ातील पाणी, गटारांमधून आलेल्या जलवाहिन्यांमधील पाण्याचा वापर होतो. चाळींमध्ये ओल असल्याने साथीचे रोग झटकन या भागात पसरत आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे नाहीत. मलनिस्सारण वाहिन्या नाहीत. अनेक ठिकाणी उघडय़ावर शौचविधी केले जात आहेत, असे येथील रहिवाशांनी सांगितले. टिटवाळा भागातील कचरा नियमित उचलला जात नाही. टिटवाळा प्रभाग येत असलेल्या ‘अ’ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी पालिकेतील एका सर्वोच्च पदाधिकाऱ्याच्या खास समर्थकाला टिटवाळाभर सुरू असलेल्या अनधिकृत चाळी, तेथील बांधकामांच्या साइट दाखवण्यात दंग असल्याने त्यांना टिटवाळा भागातील आरोग्याच्या प्रश्नाविषयी देणेघेणे नसल्याची टीका या भागातील नगरसेवक, सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. टिटवाळ्यात नुकताच एका नागरिकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. पालिका प्रशासन मात्र डेंग्यूसदृश साथ नसल्याचे म्हणत आहे. टिटवाळ्यात मोठय़ा संख्येने अनधिकृत लॉजिंग सुरू आहे. विविध प्रकारचे नागरिक नियमित या लॉजमध्ये येत असल्याने या पीडेचा त्रास शहराला होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस पालिका कर्मचारी आणि स्थानिक नगरसेवक यांचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष असल्याने टिटवाळा शहराचे आरोग्य ढासळले असल्याची टीका येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
कचरा आणि सांडपाण्यामुळे टिटवाळ्याचे आरोग्य बिघडले..!
टिटवाळा शहराच्या चोहोबाजूने मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी पालिकेच्या परवानग्या घेऊन अधिकृत बांधकामेही सुरू आहेत.
First published on: 23-09-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titwala residentals facing health problem due to garbage and sewage