ठाणे शहरात उभ्या राहिलेल्या बडय़ा मॉलमधील दुकानदारांकडून कराचा भरणा होत नसल्याने कातावलेल्या महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी शहरातील काही मॉलमध्ये स्वत: धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गालगत उभारण्यात आलेल्या विवियाना या आलिशान मॉलवर आयुक्तांनी स्थानिक संस्था कर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत धाड टाकून लाखो रुपयांचा कर वसूल करण्यास सुरुवात केली. स्वत: आयुक्तांना धाडी टाकण्यासाठी मोहीम आखावी लागत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कर बुडविणाऱ्या मोठय़ा दुकानदारांना महापालिकेतील ठरावीक अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याची चर्चा यामुळे रंगात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू केला आहे. ठाणे शहरात स्थानिक संस्था कर प्रणाली लागू करण्यास व्यापाऱ्यांचा मोठा विरोध होता. त्यामुळे सुरुवातीपासून या कराचा भरणा करण्यास व्यापारी असहकार करतात, असा अनुभव आहे. व्यापाऱ्यांनी या कराचा भरणा करावा यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांना दोन टक्के करसवलतीचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. आयुक्त गुप्ता यांनी मान्यता देत ठरावीक रकमेचे लक्ष व्यापाऱ्यांना दिले होते. असे असतानाही या प्रस्तावास व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. ठाणे शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी अजूनही स्थानिक संस्था करासंबंधीचा असहकार सुरूच ठेवला आहे. शहरात उभ्या राहिलेल्या बडय़ा मॉलमधील व्यापाऱ्यांनी करबुडवेगिरी सुरूच ठेवली असून स्थानिक संस्था कर विभागाचे अधिकारी या दुकानदारांवर कारवाई करत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती.
महापालिकेस नियमित कराचा भरणा करणारे व्यापारी यामुळे आक्रमक बनले असून थकबाकीदार व्यापाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करा, असे आवाहन या व्यापाऱ्यांनी केले होते.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेने थकबाकीदार व्यापाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून ही कारवाई करण्यासाठी खुद्द आयुक्त गुप्ता यांनी या मोहिमेचे नेतृत्व सुरू केले आहे. ठाणे शहरात नव्याने उभा राहिलेल्या विवियाना मॉलमधील काही व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा स्थानिक संस्था कर बुडविला असून या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर गुप्ता यांनी सोमवारी धाडी टाकल्या.
फॉरेव्हर २१, मदर केअर, बेस लाइफ या दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या असून या व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा स्थानिक संस्था कर बुडविला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा