वाढीव मालमत्ता कराच्या भीतीने गेले वर्षभर मुंब्र्यातील मालमत्तांच्या सर्वेक्षणास विरोध करणाऱ्या मुंब्रावासीयांपुढे एकत्रित पुनर्विकासाचे (क्लस्टर) गाजर पुढे करत महापालिकेने जीआयएस प्रणालीच्या सर्वेक्षणास अखेर सुरुवात केली आहे.
भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कराची प्रणाली राबविण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी ठाणे, कळवा, मुंब्रा अशा वेगवेगळ्या शहरांमधील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले होते. या सर्वेक्षणामुळे मालमत्ता करात मोठी वाढ होईल आणि कराचे गौडबंगाल बाहेर येईल या भीतीमुळे मुंब््रयातील काही बडय़ा व्यावसायिक दुकानदारांनी रहिवाशांना हाताशी धरून या सर्वेक्षणात खो घातला होता. आपल्या बेकायदा घरांचे सर्वेक्षण होते आहे हे पाहून रहिवाशांमध्येही गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे सर्वेक्षणाची प्रक्रियाच बंद पडली होती. अखेर तुम्हाला क्लस्टर हवे असेल तर सर्वेक्षण होऊ द्या, अशी भूमिका घेत एकत्रित पुनर्विकासाचे गाजर दाखवून महापालिकेने मोठय़ा चलाखीने या सर्वेक्षणास सुरुवात केली आहे.  
ठाणे शहरातील मालमत्तेची अद्ययावत माहिती तयार व्हावी, यासाठी महापालिकेने सायबरटेक सिस्टिम अँड सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीमार्फत जीआयएस या अत्याधुनिक प्रणालीद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील मिळकतीचे गुगल मॅपवरील प्रत्यक्ष ठिकाण, जागेचा सव्‍‌र्हे क्रमांक, इमारत मालकाचे नाव, जमीन मालकाचे नाव, मिळकतीचे वर्णन, त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराचे मोजमाप, त्याचा वापर कशासाठी होतो, मिळकतीचे आयुष्यमान, रस्ता, विभाग आदी माहिती संकलित होणार आहे. महापालिकेतील मालमत्ता कर विभागातील गौडबंगाल लक्षात घेऊन जीआयएस प्रणालीद्वारे होणारे हे नवे सर्वेक्षण अतिशय ऊपयुक्त ठरणार आहे. अनेक मालमत्तांचा नेमका वापर कसला आहे आणि त्यास कोणत्या दराने कराची आकारणी होते आहे, याची सुस्पष्ट माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणामुळे मालमत्ता कर विभागातील काळेबेरे पुढे येईल, असा राजीव यांचा दावा होता. महापालिकेच्या या सर्वेक्षणास ठाणे, कळव्यातील रहिवासी चांगला प्रतिसाद देत असताना मुंब्रा भागातील काही ठराविक मंडळी दादागिरीच्या बळावर सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला हुसकावून लावत असल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे सर्वेक्षणात ठाण्यात एक तर मुंब््रयाला दुसरा न्याय, असे काहीसे चित्र निर्माण झाले होते. या प्रणालीमुळे महापालिकेच्या रेकॉर्डवर येऊन मालमत्ता कर भरावा लागेल, अशी भीती असलेल्या मुंब्य्रातील काही रहिवाशांनी या सर्वेक्षणास विरोध केला होता. त्यामुळे मुंब्रा परिसराचे या प्रणालीद्वारे सर्वेक्षण होऊ शकले नव्हते. मध्यंतरी, महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मुंब्य्रातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये पुनर्विकास हवा असेल तर सर्वेक्षण करावे लागेल, अशी भूमिका गुप्ता यांनी त्यांच्यापुढे मांडली होती. तसेच या सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यास सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद देत सर्वेक्षणासाठी पुढकार घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, महापालिकने आता मुंब्रा परिसरात पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू केले आहे.
पालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाची माहिती..
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मुंब्रा परिसर वगळून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक लाख ४४ हजार १९० झोपडय़ा, ४३० निम्न पक्की बांधकामे, दोन लाख ११ हजार ७२३ सदनिका अशी आकडेवारी समोर आली आहे. याच्यासह नऊ लाख ४६ हजार १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे वाणिज्य पार्क, दोन लाख ५१ हजार २६७ चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये शाळा, रुग्णालये, बँक तसेच एक लाख ६४ हजार ५६० चौरस मीटरमधील पार्किंग आणि सात लाख २३ हजार ९६७ चौरस मीटर औद्योगिक क्षेत्र, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा