*  वातानुकुलीत सेवाही महागणार
 ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील लक्षावधी प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने (टीएमटी) तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून दोन रुपयांपासून दहा रुपयांपर्यत ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परिवहन समितीने दरवाढीस या पूर्वीच हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दर महिन्याला होणारा सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा लक्षात घेऊन या भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, असा दावा टीएमटी व्यवस्थापनाने केला आहे. या नव्या भाडेतक्त्यानुसार टीएमटीचा प्रवास बेस्ट तसेच एनएमएमटीपेक्षाही महाग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३२८ बसेस असून त्यापैकी जेमतेम २२० ते २३० बसेस आगाराबाहेर पडतात. अपुऱ्या बससेवेमुळे एकीकडे ठाणेकर प्रवाशी हैराण असताना वेगवेगळ्या कारणांमुळे टीएमटीच्या सुमारे १०० हून अधिक बसेस आगारामध्येच उभ्या असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टीएमटी बसेसच्या प्रवासी सेवेविषयी ठाणेकरांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतो. असे असताना दिवसाला होणारा सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा असह्य़ झाल्याने भाडेवाढीचा पर्याय स्वीकारीत या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव टीएमटी व्यवस्थापनाने तयार केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार सुरुवातीच्या दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी दोन रुपयांची तर नंतरच्या ठराविक टप्प्यात दोन ते तीन रुपयांची दरवाढ सुचविण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या भाडेवाढीच्या तुलनेत टीएमटीची प्रस्ताविक तिकीट दरवाढ जास्त आहे. तसेच काही टप्प्यांमध्ये टीएमटीची नवी भाडेवाढ बेस्ट प्रवासापेक्षाही महाग असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. एक ते ४० किलोमीटरच्या वेगवेगळ्या टप्प्यात दोन ते १० रुपयांपर्यत भाडेवाढ होणार आहे. ४० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासााठी प्रत्येक दोन किलोमीटर तसेच त्याच्या अंश भागास पाच रुपयांची भाडेवाढ आकारण्यात येणार आहे. या भाडेवाढीस सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या मंजुरी घेणे आवश्यक ठरणार आहे.     

साध्या बसेसच्या प्रवासी भाडय़ात वाढ सुचवित असताना टीएमटी व्यवस्थापनाने वातानुकुलीत बससेवेचा नवा दरतक्ता तयार केला आहे. यानुसार वेगवेगळ्या टप्प्यात १० रुपयांपासून २० रुपयांपर्यत दरवाढ सुचविण्यात आली आहे. एक ते ४० किलोमीटरच्या वेगवेगळ्या टप्प्यात पाच रुपयांपासूनही भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.   

Story img Loader