ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे ४० कोटी रुपये शिल्लक असल्याची कबुली प्रशासनाने दिलेली असतानाच महापालिकेचे अंग असलेली ठाणे परिवहन सेवेचीही आर्थिक घडी कोलमडून पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे येत्या महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, असा प्रश्न परिवहन प्रशासनासमोर उभा राहिला आहे. दरम्यान, शुक्रवारच्या सभेत परिवहन सदस्यांनी याच मुद्दय़ाला हात घालत भंगार विकून कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत, अशी मागणी केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी टीएमटी प्रशासनावर भंगार विकायची आफत ओढावल्याचे चित्र आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात तीनशेहून अधिक बसगाडय़ा आहेत. मात्र, त्यापैकी बहुतेक बसगाडय़ा नादुरुस्त असल्याने आगारात धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे सुमारे १६० ते १८० बसगाडय़ा दिवसाला आगाराबाहेर पडतात. ठाणेकरांना चांगली सुविधा देण्यासाठी महापालिकेने परिवहन उपक्रम सुरू केला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिवहनचा दर्जा ढासळला आहे. तसेच बसगाडय़ा रस्त्यामध्येच बंद पडत असल्याने प्रवाशी वर्गही हैराण झाला आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये परिवहनचे उत्पन्न आणि खर्चामध्ये कमालीची तफावत येऊ लागली आहे. त्यामुळे परिवहनचा आर्थिक डोलारा काहीसा कोलमडला आहे. मात्र, महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे परिवहन उपक्रम काहीसा तरला होता. पण, परिवहन कर्मचाऱ्यांना लागू होणारा वेतन आयोग तसेच उपक्रमासाठी येणारा खर्च, यामुळे परिवहनच्या खर्चात प्रचंड वाढ झाली असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असे काहीसे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचे अनुदान मिळत असतानाही परिवहन प्रशासनाची आर्थिक घडी विस्कटली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ठाणे महापालिकेने परिवहन उपक्रमाला कमी अनुदान देऊ केले आहे. तेव्हापासूनच परिवहन उपक्रम आर्थिक संकट ओढवणार, अशी चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, ते अनुदानही अद्याप मिळालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ठाणे महापालिकेमध्ये जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून जकात विभागाकडे पाहिले जात होते. पण, त्याऐवजी सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था करातून जकातीपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेस मिळाले, असा अधिकाऱ्यांचा होरा होता. मात्र या करास शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने त्यांच्याकडून अद्याप कराचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली असून महापालिकेच्या तिजोरीत अवघे ४० कोटी रुपये शिल्लक आहेत, अशी कबुली नुकतीच महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे येत्या महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, असा प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे. असे असतानाच महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून असलेली परिवहन सेवासुद्धा आर्थिक संकटात सापडली असून तिच्यासमोरही कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान याच मुद्दय़ावरून परिवहन सदस्यांनी शुक्रवारच्या सभेत अनेक मुद्दे उपस्थित करत परिवहन प्रशासनाने भंगार विकून कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
चार ते पाच कोटी मिळण्याची आशा..
परिवहन सेवेच्या ताफ्यात असलेल्या ९४ नादुरुस्त बसगाडय़ा विकण्यासंबंधींच्या ठरावास नोव्हेंबर २०११ मध्ये परिवहन समिती तसेच महापालिकेच्या सर्व साधारण समितीने मान्यता दिली आहे. मात्र या बसगाडय़ांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरटीओकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. त्यातून परिवहन उपक्रमास सव्वा दोन कोटी रुपये मिळू शकतात. तसेच वागळे, कळवा आगारामधील बॅटरी, स्पेअर पार्ट आणि टायर असे भंगाराच्या साहित्याची विक्री करावी, त्यातून दोन कोटी रुपये मिळू शकतील. जेणेकरून या दोन्ही भंगार विक्रीच्या प्रक्रियेतून परिवहन उपक्रमास चार ते पाच कोटी रुपये मिळतील आणि त्यातून कर्मचाऱ्यांचे पगार देता येतील, असे पर्याय सभेत सुचविले आहेत, अशी माहिती परिवहन सदस्य अजय जोशी यांनी दिली.
पगारासाठी टीएमटीवर भंगार विकायची आफत..
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे ४० कोटी रुपये शिल्लक असल्याची कबुली प्रशासनाने दिलेली असतानाच महापालिकेचे अंग असलेली ठाणे परिवहन सेवेचीही आर्थिक घडी कोलमडून पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-05-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmt want to sale scrap for employees salary