राज्यात व देशात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला सामान्य जनता वैतागली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे नमूद करीत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सत्तेवर येण्यासाठी शिवशक्तीला भीमशक्तीशिवाय पर्याय नाही, असा दावा केला. एवढेच नव्हे तर महायुतीची सत्ता आल्यानंतर आपण उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्नही रंगवायला त्यांनी सुरुवात केली आहे.
सोलापुरात रिपाइंच्यावतीने नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आयोजित संघर्ष मेळाव्यात आठवले बोलत होते. यावेळी त्यांच्या गटाचे मोठे शक्तिप्रदर्शन घडले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या संघर्ष मेळाव्यास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले व पुत्राची हजेरी होती.
सत्तापरिवर्तन आम्हाला समाजपरिवर्तनासाठी हवे आहे. सत्ता गोरगरीब, उपेक्षित, शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी राबविण्याचा आमचा निर्धार आहे. आगामी निवडणुकीत रिपाइंकडून पन्नास टक्के उमेदवार हे सवर्ण समाजाचे असतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाने उचलून धरली आहे. त्यास आपला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी घोषित केले.

Story img Loader