महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सहा वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने २२ लाख ५७ हजार रुपये खर्च करून बसविलेली बायोमेट्रिक यंत्रणा पालिका कर्मचाऱ्यांनी सिगारेटचे चटके देऊन बंद पाडल्याचा अहवाल संगणक विभागाने पाच वर्षांपूर्वी देऊनही ती यंत्रणा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे उघड झाले आहे.
 पालिकेने ६६ बायोमेट्रिक यंत्रे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी बसविण्यासाठी घेतली होती. या यंत्रांमुळे पालिकेत वेळेवर कामाला यायला लागते व कार्यालयाबाहेर निघण्याची वेळ निश्चित होती.
बायोमेट्रिक यंत्रे यापूर्वी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारांवर, डोंबिवली विभागीय कार्यालयात आणि हजेरी शेडवर बसविण्यात आली होती. सकाळी पावणे दहा वाजता कार्यालयात प्रवेश करताना अंगठय़ाचे ठसे यंत्रावर ठेवल्याशिवाय कर्मचाऱ्यांची हजेरी लागली जात नसे. संध्याकाळी साडेपाच वाजता पुन्हा अंगठय़ाची नोंद करावी लागत असे. या यंत्रांमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना सकाळीच उठून आपल्या कामाच्या ठिकाणी जावे लागत असे. सफाई कामगार, आरोग्य निरीक्षक यांची वेळेवर हजेरी लागण्यासाठी तारांबळ उडत होती. या यंत्रांमुळे कामावर न येता आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही सफाई कामगार कामावर न येता आपली हजेरी लावून पगारातील ‘लक्ष्मी’ अधिकाऱ्यांच्या पूजनासाठी ठेवत असत. तो प्रकार बंद पडला होता. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेषत: महिलांनी या सुविधेविषयी समाधान व्यक्त केले होते.
सन २००५ मध्ये पालिकेत एका मृत सफाई कामगाराच्या नावे पगार काढून तो अधिकाऱ्यांकडून परस्पर हडप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीला आला होता. सन २००६ मध्ये माजी आयुक्त राम शिंदे यांनी पालिकेत कर्मचाऱ्यांची हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला होता. या सुविधेसाठी २२ लाख ५७ हजार खर्च करून ६६ बायोमेट्रिक यंत्रे पुण्याच्या अ‍ॅक्सेस कंपनीकडून खरेदी करण्यात आली होती. कल्याण, डोंबिवली मुख्यालयांमध्ये २२, पालिका हद्दींमधील सफाई कामगारांच्या हजेरी शेडवर ४४ यंत्रे बसविण्यात आली होती.
बायोमेट्रिकमुळे डोकेदुखी
बायोमेट्रिक पद्धतीमुळे पालिकेत, हजेरी शेडवर डोळे चोळत सकाळीच हजर राहावे लागते. काही सफाई कामगारांकडून आरोग्य निरीक्षकांना मिळणारे ‘लक्ष्मी’दर्शनही या पद्धतीने बंद पाडले होते. त्यामुळे या तत्पर यंत्रणेविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. हळूहळू ही यंत्रे बंद पाडण्यासाठी हजेरी शेडवरील कामगारांनी सुरुवात केली. बायोमेट्रिक यंत्रावरील अंगठा ठेवण्याच्या जागेवर पेटत्या सिगारेटचे चटके देऊन ते जाळण्यात आले. जळणाऱ्या भागात नंतर सुट्टी नाणी, दाभणासारखी टोकदार साधने टाकण्यात आली. बायोमेट्रिक यंत्रणा हळूहळू बंद पाडण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.  
प्रशासनाला जाग
पालिका कार्यालयांमध्ये बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रांमधून बोटाच्या ठशांच्या छापील प्रती बाहेर येत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगार काढण्यात अडचणी येऊ लागल्या. याप्रकरणाची चौकशी संगणक विभागाचे तत्कालीन संरचनात्मक व्यवस्थापक अनिल लाड यांनी सन २००८ मध्ये केली. यंत्रांमधील सेन्सरना कर्मचाऱ्यांनी सिगारेटचे चटके देऊन ती बंद पाडली आहेत असा अहवाल लाड यांनी तत्कालीन प्रशासनाला दिला होता. याप्रकरणी आरोग्य निरीक्षकांना फक्त नोटिसा पाठविण्याचा देखावा प्रशासनाने केला होता.
सन २०१३ पर्यंत प्रशासनाने बायोमेट्रिक पद्धत पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. ही यंत्रणा सुरूच होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते सफाई कामगारांची साखळी कार्यरत आहे. महापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवकांना या बायोमेट्रिक पद्धतीमधून काहीही मिळणार नसल्याने तेही या गोंधळाविषयी गेले पाच ते सहा वर्ष मौन बाळगून बसले आहेत. या विभागाच्या एका अधिकाऱ्याने लवकरच बायोमेट्रिक यंत्रांची दुरुस्ती करून ती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा