हरवलेल्या वाहनांचा शोध ‘ऑनलाइन’ घेता येण्याची सुविधा पुणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजय खेडेकर यांनी पुढाकार घेऊन विकसित केलेल्या ‘फाइंड लॉस्ट व्हेइकल डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या हरवलेल्या वाहनांचा शोध घेता येणार असून, ही सेवा विनामूल्य आहे. ठिकठिकाणी बेवारस आढळलेल्या वाहनांची माहिती, क्रमांक आणि छायाचित्रे या संकेतस्थळावर दररोज दिली जाणार आहे. तसेच, नागरिकही हरवलेल्या वाहनांची माहिती या संकेतस्थळावर देऊ शकतील. त्यातून वाहन शोधण्यास मदत होईल, अशी माहिती खेडेकर यांनी दिली. ‘माहिती तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल,’ असे या प्रसंगी अजित पवार म्हणाले. या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, अ‍ॅड. भगवान साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. हरवलेल्या आणि बेवारस वाहनांची माहिती, छायाचित्रे या संकेतस्थळावर पाठवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.     

Story img Loader