स्वत:ची मोटार पोलिसांकडे जप्त असताना इतर पोलीस ठाण्यात ती चोरीस गेल्याची तक्रार देऊन विमा कंपनीकडून मोटारीची विमा रक्कम उकळवणाऱ्या भामटय़ाचा डाव कामोठे पोलिसांनी उधळून लावला आहे. विशेष म्हणजे संबंधित मोटार चोरीस गेल्याची तक्रार मोटारमालक व वाहतूक पोलिसांनी दोन विविध पोलीस ठाण्यांत दाखल केली आहे. हा फसवणुकीचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.  
खोपोली येथे राहणारा विलास मराठे हा मारुती इको व्हॅनने प्रवासी वाहतूक करून आपली उपजीविका चालवायचा. २१ एप्रिलला विलासला कंळबोली सर्कल येथून जात असताना वाहतूक विभागातील पोलीस हवालदार एच. बी. कदम यांनी त्याला थांबविले. विलासजवळ हवालदार कदम यांनी मोटारीच्या कागदपत्रांची विचारणा केली. मात्र कागदपत्रे नसल्याने त्याची मोटार कळंबोली वाहतूक ठाण्यात जप्त करण्यात आली. अनेक दिवस उलटले तरीही विलास आपल्या मोटारीची कागदपत्रे पोलिसांना दाखवायला आला नाही. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या ताब्यातून विलासची जप्त मोटार गायब झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत पोलीस हवालदार कदम यांनी कामोठे पोलीस ठाण्यात इको व्हॅन चोरीस गेल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक चेतना चौधरी या करत असताना या मोटारीच्या मूळ मालकाचा जबाब घेण्यासाठी त्या विलासच्या घरी गेल्यावर विलासच्या जबाबात त्यांना अस्पष्टता दिसली. विलासची पोलीस अधिकारी चौधरी यांनी कसून चौकशी केल्यानंतर या मोटारचोरीला तोंड फुटले. विलासने कळंबोली वाहतूक विभागातून ही आपलीच मोटार चोरून एका शोरूममध्ये लपवून ठेवली होती. एवढय़ावर विलास न थांबता त्याने ही मोटार चोरी झाल्याची तक्रार २९ एप्रिल रोजी खोपोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. विलासने हा सर्व डाव मोटारीच्या विम्याची रक्कम हडपण्यासाठी केल्याचे पोलिसांनी सांगितले. दहावी इयत्तेपर्यंत शिकलेल्या विलासकडून संबंधित इको व्हॅन पोलीस अधिकारी चौधरी यांनी जप्त करून त्याला अटक केली आहे. स्वत:ची मोटार पोलिसांच्या ताब्यातून चोरी केल्यामुळे आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा गुन्हा विलासवर दाखल आहे.
या प्रकरणामुळे नवी मुंबईतील वाहतूक विभागाकडे जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने पोलिसांच्या ताब्यातील वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा