आघाडी सरकारच्या काळात महिलांवर मोठय़ा प्रमाणात अत्याचार झाले. आरक्षणासोबत संरक्षण महत्त्वाचे असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वतीने औंढा नागनाथ येथे आयोजित महिला मेळाव्याचे उद्घाटन आमदार गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, तर मंगला कांबळे, राजश्री पाटील, कुमोदिनी वडवणे, निलावंती संवडकर, माजी आमदार गजानन घुगे, जयप्रकाश मुंदडा आदी उपस्थित होते. आमदार गोऱ्हे यांनी या वेळी आघाडी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. राज्यातील महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली. परळीतील स्त्रीभ्रूण हत्येतील आरोपी डॉ. मुंढे आजही मोकाट फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रलोभन दाखवून महिलांची विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत. नागपूरकर महिलांनी गुंडाला केलेल्या शिक्षेचे बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले.
अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन करून वाढती महागाई, मराठवाडय़ातील दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची तीवट्रंचाई, अवैध दारू विक्री या प्रश्नांवर आघाडी शासनाचा समाचार घेतला. महिलांच्या संरक्षणासाठी आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

Story img Loader