दोन दशकांपूर्वीची तरुण पिढी आता प्रौढ-जाणत्यांच्या भूमिकेत आहेत. मात्र, त्यांच्या उमेदीच्या काळातील त्यांचे स्वप्नांचे सौदागर असणारे बॉलीवूडमधील अनेक स्टार कलाकार अजूनही नवनव्या चित्रपटांमधून नायक म्हणून टेचात वावरत आहेत. काटेकोर आहार नियोजन, नियमित व्यायाम, अत्याधुनिक मेकअप यांच्या जोडीनेच व्हीएफएक्सचे तंत्रही या स्टार्सची फेस व्हॅल्यू राखण्यात आता वरदान ठरू लागले आहेत. वाढत्या वयामुळे आलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ‘व्हीएफएक्स’च्या वॉशने धुवून काढून अगदी वीस वर्षांपूर्वीसारखा आपला तरुण, तुकतुकीत चेहरा रुपेरी पडद्यावर चमकत ठेवण्यात या कलाकारांना यश आले आहे.
ऐंशीच्या उत्तरार्धात कारकिर्दीला सुरुवात करणारे आमीर खान, सलमान खान, शाहरूख खान आदी नायकांनी २५ वर्षांनंतरही आपले नायकत्व कायम राखले आहे. गेल्याच महिन्यात कारागृहात जाण्याआधी संजय दत्तचा ‘पोलीसगिरी’ प्रदर्शित झाला. त्याचा ‘रॉकी’ हा पहिला चित्रपट तर ३२ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी १९८३ मध्ये ‘बेताब’द्वारे सनी देओलने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. आमीर खान-जुही चावलाचा ‘कयामत से कयामत तक’ १९८८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी १९८९ मध्ये सलमान खानने ‘मैने प्यार किया’द्वारे आगमन केले. अक्षय कुमार (खिलाडी-१९९२), अजय देवगण (फूल और काँटे-१९९१), शाहरूख खान (कभी हाँ कभी ना-१९९३), सैफ अली खान (परंपरा-१९९२) ही सारी एक-दोन वर्षांच्या फरकाने पडद्यावर झळकलेली मंडळी आता दोन दशकांनतरही कमी-अधिक प्रमाणात आपले नायकत्व राखून आहेत. येत्या आठवडय़ात शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ प्रदर्शित होतोय. या चित्रपटात मोठय़ा प्रमाणात अशा प्रकारे व्हीएफएक्सचा वापर करण्यात आल्याचे बोलले जाते.
स्टिव्हन स्पिलबर्गच्या ‘ज्युरासिक पार्क’ने भारतीयांना चित्रपटांमध्ये संगणकीय स्पेशल इफेक्टस् कोणती किमया करू शकतात, हे दाखवून दिले. त्यानंतर हळूहळू बॉलीवूडमध्येही काही प्रमाणात स्पेशल इफेक्टस्चा वापर सुरू झाला. सर्वसाधारणपणे मानवी कौशल्यांच्या मर्यादांपलीकडचे परिणाम साधण्यासाठी चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स अथवा स्पेशल इफेक्टस्चे तंत्र वापरले जाते. आपल्याकडे नेमके उलटे होते. मुख्यत: चित्रीकरणातील चुका, गफलती दुरुस्त करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. त्यातूनच आता नायक-नायिकांच्या चेहऱ्यावरील वार्धक्याच्या खुणा पुसून टाकण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर होऊ लागला आहे. पूर्वी फक्त जाहिरातींच्या प्रत्येक फ्रेमचे डिजिटल करेक्शन केले जात होते. अतिशय कमी कालावधीत उत्पादनाचा ग्राहकांवर प्रभाव पाडण्यासाठी ते उपयोगी ठरते. आता चित्रपटांसाठीही त्याचा वापर होऊ लागला आहे. ‘व्हीएफएक्स’ प्रक्रिया महागडी असल्याने सुरुवातीच्या काळात त्याचा मर्यादित वापर होत होता. मात्र आता कमालीच्या लोकप्रिय असणाऱ्या नायकांना ते आहेत, त्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी अगदी ‘फ्रेम टु फ्रेम’ व्हीएफएक्सचा वॉश दिला जाऊ लागला आहे. कपडे धुण्याच्या यंत्राने ताक घुसळण्यासारखाच हा प्रकार असला तरी त्यामुळे भारतीय स्पेशल इफेक्टस् स्टुडिओंना सध्या बरे दिवस आहेत.
स्वप्नांच्या दुनियेतही पुरूषप्रधान संस्कृती
स्वप्नांच्या या मायावी दुनियेत मेकअप, गेटअप अथवा आताच्या व्हीएफएक्सद्वारे कारकीर्द लांबविण्याच्या प्रयत्नातही पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. कारण व्हीएफएक्सद्वारे फेस करेक्शन करण्यात नायकांचाच अधिक भरणा आहे. बॉलीवूडमधील अनेक नायकांच्या आता चित्रपट निर्मिती कंपन्या असून त्यांच्या चेहऱ्यावरच कंपनीचे भवितव्य अवलंबून असल्याने संगणकीय क्लृप्त्यांद्वारे असे ‘डिजिटली’ तरुण राहणे त्यांच्यासाठी अपरिहार्य ठरू लागले आहे.
हीरो ते सुपरहीरो…
बॉलीवूडमधील बहुतेक चित्रपटांचे कथानक अनेकदा स्वप्निल, अतार्किक आणि त्यातील व्यक्तिरेखा ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’(लार्जर दॅन लाइफ) स्वरूपाच्या असतात. त्यातूनच अनेक भारतीय हीरो सुपरहीरो बनले आहेत. दक्षिणेतील कमल हसन, रजनीकांत तर बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आदींचा त्यात समावेश आहे. कथानकांमधून काम करता करता त्यांची कारकीर्द दंतकथा बनली आहे. कमल हसनने ‘हिंदुस्थानी’, रजनीकांतने ‘इंडियन’ तर अमिताभ बच्चनने ‘पा’ सिनेमातून संगणकीय करामतींद्वारे व्यक्तिमत्त्व किती बदलू शकते, हे दाखवून दिले आहे.
नायकत्व राखण्यासाठी!
दोन दशकांपूर्वीची तरुण पिढी आता प्रौढ-जाणत्यांच्या भूमिकेत आहेत. मात्र, त्यांच्या उमेदीच्या काळातील त्यांचे स्वप्नांचे सौदागर असणारे बॉलीवूडमधील अनेक स्टार कलाकार
First published on: 11-08-2013 at 07:02 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To keep protagonist alive