येत्या ३१ डिसेंबरला नववर्षांच्या जल्लोषात वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि जंगल परिसरात शांतता राखण्याच्या उद्देशाने विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये हौशी पर्यटकांना रात्रीच्या वेळी प्रवेश देण्यास वन विभागाने बंदी आदेश जारी केला आहे. मात्र पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मानसिंगदेव अभयारण्य, बोर, नवीन बोर, टिपेश्वर आणि उमरेड-क ऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटकांना केवळ सकाळ व दुपारच्या फेरीसाठी प्रवेश दिला जाईल. स्थानिक गाईड्सना रोजगार मिळावा यासाठी सकाळ आणि दुपारी प्रवेश खुला राहणार असून रात्रीच्या वेळी निवासाची व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी कळविले आहे.
गोंदिया वनसंरक्षक (वन्यजीव) विभागाअंतर्गत येत असलेल्या नवीन नागझिरा अभयारण्य, तसेच नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव अभयारण्य पर्यटकांसाठी ३१ डिसेंबरला बंद राहील, अशी माहिती गोंदिया वन विभागाचे उपवनसंरक्षक गुरमे यांनी दिली. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात सिल्लारी येथून आता दर सोमवार ऐवजी बुधवारी प्रवेश बंद राहील. स्थानिक रहिवाशांनी मागणी केल्यानंतर पेंच व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा बदल करण्यात आला. नव्या बदलांची नोंद पर्यटकांनी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.        

Story img Loader