देशाच्या एकतृतीयांश भागातील नक्षलवाद हा वाढती लोकसंख्या व बेकारीतून निर्माण झाला. नक्षलवाद रोखण्यासाठी पारंपरिक शिक्षण प्रणालीऐवजी उपजिविकेचे साधन मिळवून देणाऱ्या शिक्षणास प्राधान्य दिल्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे प्रतिपादन, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे यांनी एका समारंभात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी मंत्री ना. मधुकर पिचड होते.
डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिराचे विस्तारित इमारतीचे उद्घाटन व संस्थेचे ५० व्या वर्षांनिमित्त माजी विद्यार्थिनी मेळाव्याचा शुभारंभ वळसे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे, आमदार अशोक काळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, स. ग. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक जगताप, उत्तर नगर जिल्हा रयत संस्था सल्लागार समिती अध्यक्ष अरुण कडू, सदस्य रावसाहेब म्हस्के, प्रांताधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना वळसे म्हणाले की, लवकरच आपल्या देशातील लोकसंख्या जगात अव्वल स्थानावर येईल. चीन देशाने वाढत्या लोकसंख्येचा बोजा सांभाळण्यापेक्षा त्याचे ताकदीमध्ये रुपांतर केले. याउलट आपल्या देशात हा बोजा लादल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
ते म्हणाले की, आज देशात ४० हजार अभियांत्रिकी महाविद्यालयात जागा असून पात्रता परीक्षेस अवघे २० हजार विद्यार्थी बसले आहेत. यामुळे यावर्षी २० हजार जागा शिल्लक आहेत. जि. प. च्या शाळा ओस पडत आहेत. आज सध्याच्या परिस्थितीत उपजीविकेच्या शिक्षणाची गरज असताना विद्यार्थ्यांना ज्याची गरज आहे, आवड व क्षमता असलेले शिक्षणाऐवजी पारंपरिक शिक्षण लादले जाते. सर्वच डॉक्टर, इंजिनिअर होणे देशाला परवडणारे नाही. यामुळे देशात वाढत्या बेकारीमुळे त्रस्त झालेला युवक नक्षलवादी बनू नये याकरिता पालक, शिक्षक व समाज व्यवस्थापनाने त्यांच्यावर योग्य संस्कार घडवून विद्यार्थ्यांचे आवडीचे व कुवतीचे शिक्षण देणे हीच काळाजी गरज आहे. या वेळी बोलताना आदिवासी मंत्री ना. पिचड यांनी सांगितले की, नगर- नाशिक जिल्ह्य़ातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष ना. वळसे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासमवेत आगामी जूनअखेपर्यंत पिण्याचे व शेतीचे पाण्यासाठी महिनाभरात बैठक घेण्यात येईल.
नगर जिल्ह्य़ाला दुष्काळी परिस्थितीस तोंड देण्यासाठी राज्य शासनाने १०७५ कोटी रुपये दिले आहेत. सध्याची पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी कोकणातील वाया जाणारे पाणी मिळविण्यासाठी राज्य शासन सर्वस्व पणाला लावील, अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी माजीमंत्री शंकरराव कोल्हे, आ. अशोक काळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संस्थेच्या प्राचार्या सौ. गोंदकर यांनी केले.

Story img Loader