सरत्या वर्षांला निरोप देऊन नव्या वर्षांचे स्वागत करताना बेधुंद तरुणाईकडून केले जाणारे हिडीस प्रदर्शन हे नेहमीचे दिसणारे चित्र बदलण्याचा प्रयत्न सोलापूरच्या हिंदवी परिवाराने गतवर्षांप्रमाणेही यंदाही हाती घेतला आहे. नूतन वर्षांच्या स्वागताप्रीत्यर्थ रक्तदान शिबिरासह येत्या ४ ते ६ जानेवारीदरम्यान कळसूबाई-हरिश्चंद्र व रतनगड पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन हिंदवी परिवाराने केले आहे.
३१ डिसेंबर साजरा करायला विरोध नाही. परंतु इंग्रजी नववर्षांचे स्वागत करत असताना बिअर बारमध्ये बसणारा तरुण, मद्यधुंद अवस्थेत बाईक चालवणारा तरुण असे नेहमीचे चित्र हिंदवी परिवाराला बदलायचे आहे. या बाबतची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी पत्रकार परिषदेत मांडताना सरत्या वर्षांला निरोप देऊन नव्या वर्षांचे स्वागत करण्याच्या कार्यसंस्कृतीला विधायक वळण देण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून केला जात असल्याचे सांगितले. गतवर्षांप्रमाणे यंदाही रक्तदान करून ३१ डिसेंबर साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सर्व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांना, युद्धभूमीवर शिवभक्तांना प्रत्यक्ष नेऊन भूगोलासह इतिहासाची माहिती देण्यासाठी येत्या ४ ते ६ जानेवारीदरम्यान कळसूबाई-हरिश्चंद्र-रतनगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत अचलपूरचे (अमरावती) आमदार बच्चू कडू, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, अंबादास दानवे (औरंगाबाद), प्राचीन शस्त्रांचे अभ्यासक गिरीश जाधव (मुंबई), पोलीस अधिकारी सोमनाथ घार्गे यांचाही सहभाग राहणार आहे.
रक्तदान शिबिरासह या पदभ्रमण मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी १ जानेवारीपर्यंत शिवसहय़ाद्री आरोग्यधाम (अॅक्सिस बँकेजवळ, होटगी रोड, सोलापूर-मोबाइल क्र. ९८९०२६७०२६) किंवा कल्पक डिजिटल (३१, अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर, दत्त चौक, सोलापूर-मोबाइल ९४२२०६७३४१) व अभिजित अक्षर वर्ग (भडंगे गल्ली, बाळीवेस, सोलापूर मोबा. ९०११०१४३९९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले आहे.

Story img Loader