रेल्वे स्थानकातील अतिरिक्त पादचारी पूल उभारणीच्या कामाला वेग आला आहे. या कामासाठी १३ व १५ जुलै रोजी ‘मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान संपूर्ण नियोजन करून मेगाब्लॉक घेण्यात आला. काम सुरू असताना मुंबई-भुसावळ तसेच भुसावळ-मुंबई हे फलाट क्रमांक दोन व तीनवरील लोहमार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. या मार्गावरची अतिउच्च दाबाची विद्युतवाहिनी बंद करण्यात आली होती. या कामाच्या दरम्यान मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ा समिट व पानेवाडी येथून डिझेल इंजिन जोडून मार्गस्थ करण्यात आल्या.
या मेगाब्लॉक अंतर्गत अतिरिक्त पादचारी पुलासाठी तीन साखळी गर्डरची उभारणी करण्यात आली. १३ जुलै रोजी पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याअंतर्गत फलाट तीन व चापर्यंतच्या अतिरिक्त पादचारी पुलाच्या कामासाठी पुन्हा गर्डर जोडणी करण्यात येणार आहे. मनमाड रेल्वे स्थानकात संपूर्ण रात्रभर मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या गाडय़ांची ये-जा सुरू असते. पहाटेनंतर मात्र वाहतूक काहीशी कमी होते. त्यामुळे या मुख्य मार्गावरचे काम पहाटे करण्यात आले. शनिवारी मात्र साडेदहानंतर मेगाब्लॉक घेऊन काम केले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा मंगळवारी मेगाब्लॉक राहील. उत्तर महाराष्ट्रातील या प्रमुख स्थानकात कित्येक वर्षांपासून अतिरिक्त पादचारी पुलाचे काम रखडले होते.