उन्हाळी आवर्तनांसाठी खंडपीठात धाव
भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याच्या उन्हाळी हंगामातील तीन आवर्तनांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका अशोक सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्याची सुनावणी उद्या (मंगळवारी) होणार आहे.
रब्बीचे एक आवर्तन झाले. परंतु पाटबंधारे विभागाने अद्याप उन्हाळी हंगामातील आवर्तनाचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. वेळेवर पाण्याचे नियोजन न झाल्यास तालुक्यातील शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे. परिसरातील ऊस पिके जळू लागली आहेत. याचा विपरित परिणाम अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर होणार असून तालुक्याचे अर्थकारणच मोडणार आहे. त्याचबरोबर लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहणार आहे. म्हणून सहकारी साखर कारखाना, तसेच ब्लॉकधारक शेतकऱ्यांच्या वतीने भाऊसाहेब विठ्ठल दौंड, तसेच कमलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब कांगुणे यांनी संयुक्तपणे अ‍ॅड. राहुल कर्पे यांच्यामार्फत ही जनहीत याचिका दाखल केली आहे. खंडपीठापुढे यापूर्वी १७ डिसेंबरला सुनावणी झाली होती. आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या पाणी वाटप धोरणानुसार श्रीरामपूर (पूर्व व पश्चिम) तालुक्याला उपलब्ध पाणी साठय़ातील ५२ टक्के हिस्सा देण्याचे ठरले असताना या भागातील पिकांना सिंचनासाठी पाटबंधारे विभागाकडून वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. याउलट भंडारदरा व निळवंडे धरणातून मराठवाडय़ाकरिता म्हणून साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोषाचे वातावरण आहे.
सरकार व पाटबंधारे खाते दाद देत नसल्याने न्यायालयात अशोक कारखान्याने दाखल केलेल्या जनहीत याचिकेमुळे आपल्या हक्काच्या पाण्याविषयी श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याचिकेतील मागणीनुसार आता बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले असून रब्बीचे आर्वतन घेण्यात आले आहे. उन्हाळी हंगामातील तीन आर्वतनांची मागणी कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा