राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवून जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे ठिय्याच दिला होता. अखेर गुरुवारी केंद्रेकरांच्या बदलीचे आदेश निघाले. केंद्रेकर यांची बदली होताच नवे जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळ जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी गुरुवारीच सूत्रेही स्वीकारली. मात्र, कमालीची गुप्तता पाळून घडलेल्या या घडामोडींमुळे जिल्ह्य़ात तीव्र संताप व्यक्त झाला. त्याचीच परिणती उद्या (शुक्रवारी) जिल्ह्य़ात ‘बंद’ची हाक देण्यात झाली.
दुष्काळात राष्ट्रवादीचे मंत्री सुरेश धस यांच्याबरोबर केंद्रेकर यांचे चांगलेच बिनसले असल्याचे पुढे आले होते. अनावश्यक टँकर व जनावरांच्या छावण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने राष्ट्रवादीची नेतेमंडळी हैराण झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे जिल्ह्य़ातील नेत्यांनी केंद्रेकरांच्या बदलीसाठी लकडा लावला होता. मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटीही घेण्यात आल्या. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही केंद्रेकरांच्या बदलीसाठी रेटा लावला होता. केंद्रेकर यांची बदली झाल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊल न ठेवण्याचा निर्धारही त्यांनी काहींकडे बोलून दाखविला होता.
परंतु काही महिन्यांपूर्वीच जनरेटय़ामुळे बदली रद्द झालेल्या जिल्हाधिकारी केंद्रेकर यांची अखेर नाटय़मय बदली करण्यात आली. गुरुवारीच बदलीचे आदेश निघाले. कोणाला काही कळायच्या आत नवीन जिल्हाधिकारी म्हणून नवलकिशोर राम यांनी पदभारही स्वीकारला. केंद्रेकर यांनीही तत्काळ बीड सोडले. मात्र, बदलीच्या विरोधात जिल्हाभरात संताप व्यक्त होत असून, काही कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर सामाजिक संघटनांनी उद्या (शुक्रवारी) ‘जिल्हा बंद’ची हाक दिली आहे.
दरम्यान, याची माहिती मिळताच जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या कृतीविरोधात विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. काही मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळण्यात आले. उद्या ‘जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा