परळी तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या सिरसाळा गणाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आमदार पंकजा पालवे व भाजप बंडखोर राष्ट्रवादी समर्थक आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या ताब्यातील जागा खेचून घेण्यास राष्ट्रवादीने, तर जागा कायम ठेवण्यास भाजपने दिग्गजांना प्रचारात उतरविले आहे. निवडणुकीत पुन्हा एकदा मुंडे कुटुंबातील बहीण-भाऊ आमने-सामने उभे ठाकले आहेत.
या गणातील भाजपचे सदस्य सय्यद निसार सय्यद राउफ यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उद्या (रविवारी) पोटनिवडणूक होत आहे. ही जागा कायम राखण्यास भाजपने राउफ यांची पत्नी सय्यद अजिमुन्निसा यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीने बाजार समितीचे उपसभापती बाबासाहेब काळे यांना मैदानात उतरविले आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची जागा कायम राखण्यासाठी आमदार पंकजा पालवे यांनी गावागावांत जाऊन राष्ट्रवादीची कथित गुंडगिरी व दहशतीविरुद्ध टीका केली. खासदार मुंडेंना धोका देऊन राष्ट्रवादीच्या कळपात गेलेले बंधू धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी झोड उठवली. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आमदार मुंडे यांनी सर्व राजकीय कौशल्य पणाला लावून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. प्रचारात माजी आमदार उषा दराडे, फुलचंद कराड, काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे, संजय दौंड, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांना उतरविले. मुंडे कुटुंबात फाटाफूट झाल्यानंतर तालुक्यातील सर्व जागा मोठय़ा मताधिक्क्य़ाने जिंकून खासदार मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मुंडे यांना काही ठिकाणी चांगले यश मिळाल्याचा दावा केला. या पाश्र्वभूमीवर सिरसाळ्याची जागा भाजपकडून खेचून घेत खाते उघडण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
भाजपाने आमदार पालवे यांच्याबरोबर आर. टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, गंगाभीषण थावरे, संतोष हंगे यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले. सुमारे ११ हजार मतदान असलेल्या या पट्टय़ात मुंडे बहीण-भाऊ आपले राजकीय कौशल्य सिद्ध करण्यास आमने-सामने आले आहेत.
सिरसाळा गणात आज पोटनिवडणूक
परळी तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या सिरसाळा गणाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आमदार पंकजा पालवे व भाजप बंडखोर राष्ट्रवादी समर्थक आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First published on: 23-06-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today by election in sirsala gan