यवतमाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, २ जूनला मतदान होणार असून निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक रिंगणात दहा उमेदवार असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर आणि भाजपाचे मदन येरावार यांच्यातच खरी लढत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइंचे राजेंद्र गवई आणि जोगेंद्र कवाडे गटाचे समर्थन आहे, तर शिवसेनेची भाजपासोबत आघाडी आहे.
यवतमाळचे काँग्रेसचे युवा आमदार नीलेश पारवेकर यांचे २७ जानेवारीला कार अपघातात निधन झाले होते. यावरून काँग्रेसने सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टींचा आवर्जून उल्लेख निवडणूक प्रचारात झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नंदिनी पारवेकरांना निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अन्य मान्यवर नेत्यांनी केले आहे. सहानुभूतीने विकास होत नसतो म्हणून अनुभवी आणि विकासाच्या ध्यास घेतलेल्या भाजपच्या मदन येरावार यांना निवडून देण्याचे आवाहन नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांसह इतर भाजप-सेना नेत्यांनी केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक प्रचारात सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी कुणावरही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप अथवा टीका केली नाही, हे या निवडणुकीचे खास वैशिष्टय़. विशेष असे की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रचारासाठी लोकांच्या भिंती रंगविल्या जात असतात. मात्र, यावेळी कुठेही कुणाच्याही घराच्या भिंतींचा वापर रंगविण्यासाठी झालेला दिसला नाही. त्याऐवजी फ्लेक्स पोस्टर्सचा धुमाकूळ दिसून आला.
या पोटनिवडणुकीत ३ लाख २१ हजार ५१२ मतदार असून त्यात १ लाख ६६ हजार ६८१ पुरुष मतदार, तर १ लाख ५४ हजार ८३४ महिला मतदार आहेत.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि यवतमाळचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
बुधवार ५ जूनला धामणगाव मार्गावरील मुलींच्या शासकीय निवासी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. ५ जून हा नीलेश पारवकेरांचा ४१ वा जन्मदिवस असल्याची आठवण काँग्रेस नेत्यांनी मतदारांना करून दिली आहे. यापूर्वी यवतमाळ मतदारसंघात तीन वेळा पोटनिवडणूक झाली आहे आणि त्या सर्व पोटनिवडणुकात प्रचाराची रणधुमाळी झाली होती.
पण, यावेळी होत असलेल्या चवथ्या पोटनिवडणुकीत पूर्वीसारखी रणधुमाळी नव्हती किंवा मतदार, कार्यकत्रे आणि नेत्यांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही.
निवडणुकीचा उपचार बाकी सर्वांनी पार पाडला. निवडून येणाऱ्या उमेदवाराला फक्त एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असल्याची एक बाब उत्साहाच्या अभावाला कारणीभूत असल्याचेही चर्चा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा