छावण्या सुरू ठेवण्यासाठी अनुदानाची गरज आहे, त्यामुळे याबाबत उद्या (गुरुवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्जत तालुक्याच्या शिष्टमंडळास दिले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.
कर्जत तालुक्याच्या अनेक भागांत अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. सरकारने मात्र छावण्यांना दि. ३० जूनपर्यंतच मान्यता दिली होती. तालुक्यात ६४ छावण्या सुरू होत्या. त्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या. त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळेच जिल्हाधिका-यांनी कमी पावसाच्या ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कर्जत तालुक्यातील ३२ छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार जैयसिंग भैसडे यांनी घेतला आहे.
कर्जत शहरातील अतिक्रमणचा विषय, पिण्याच्या पाणी योजनेसाठी निधी, चापडगाव ते नगर रस्त्याचे चौपदरीकरण आदी गोष्टींकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील त्यांच्याशी चर्चा केली. तालुक्याच्या शिष्टमंडळात उपसभापती किरण पाटील, राजेंद्र देशमुख, तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, बापूसाहेब नेटके, प्रकाश शिंदे, प्रकाश सुपेकर, औदुंबर निंबाळकर यांचा समावेश होता.

Story img Loader