मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवत असतानाच काँग्रेसचेच ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या समर्थकांनी ‘नारळ’ चिन्ह असलेल्या यशवंत विकास आघाडीचे नेतृत्व करून थेट मुख्यमंत्री व पक्षालाच आव्हान दिले आहे. परिणामी लक्षवेधी ठरलेली ही निवडणूक चुरशीने होत आहे. या निवडणुकीसाठी उद्या रविवारी १ सप्टेंबर रोजी कमालीच्या बंदोबस्तात मतदान होत आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरच्या मैदानावरील या निवडणुकीसाठी मतदान केंद्राबरोबरच ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व १६८ पोलीस कर्मचाऱ्यांसह जलद कृतीदलाच्या तीन तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. प्रांताधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे.

Story img Loader