महापौर व उपमहापौर निवडीसाठी उद्या, सोमवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने मनसे व अपक्षांच्या साहाय्याने जमवलेले संख्याबळ (४०) पाहता, महापौरपदी राष्ट्रवादीचे संदीप जगताप व उपमहापौरपदी काँग्रेसच्या सुवर्णा संदीप कोतकर यांच्या निवडीवर सभेत शिक्कामोर्तबच होईल. विरोधी शिवसेना व भारतीय जनता पक्ष केवळ आता निवड बिनविरोध होऊ नये एवढय़ाच मानसिकतेत आहे.
सहलीवर गेलेले राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक आज रात्री उशिरा मनमाड रस्त्यावरील हुंडेकरी लॉन्स येथे एकत्र जमणार होते. तेथे पालकमंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे आ. शरद रणपिसे, आ. अरुण जगताप यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. या बैठकीत स्थायी समिती, समितीचे इतर सदस्य, महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद, सभागृह नेतेपद आदी वादग्रस्त मुद्यांवर चर्चा घडवून आणण्याचा काँग्रेसच्या सदस्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांनी उद्याच्या निवड सभेसाठी दोन दिवसांपूर्वीच पक्षाच्या नगरसेवकांसाठी ‘व्हीप’ जारी केला आहे. मात्र अशा व्हीपची राष्ट्रवादीला आवश्यकता भासत नसल्याचा आत्मविश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
शिवसेना व भाजप युतीला प्रयत्न केल्यास आवश्यक संख्याबळ (३५) प्राप्त करणे शक्य होते, मात्र आपसातील कुरघोडय़ांमुळे युतीच्या नेत्यांनी चार दिवसांपूर्वीच त्यासाठीचे प्रयत्न सोडून दिल्याचे जाणवले. दोन्ही पक्षांचे नगरसेवक येथेच होते. उद्या सकाळी ९ वाजता सेनेने पक्षाच्या नगरसेवकांची चितळे रस्त्यावरील कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. तेथूनच ते परस्पर निवड सभेसाठी जातील. या बैठकीतच व्हीप जारी करायचा की नाही, याचा निर्णय होईल. उद्याच्या सभेसाठीही सेना-भाजपमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सभेत कोणते धोरण घ्यायचे यासाठीची युतीची एकत्रित सभा बोलावली गेलीच नाही. भाजपचे नगरसेवकही परस्पर सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी सुरू झालेले दोन्ही पक्षांतील वाद अजूनही कायमच आहेत. महापौरपदासाठी सेनेच्या अनिल शिंदे यांनी तर भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी तसेच उपमहापौरपदासाठी वाकळे यांच्यासह सेनेच्या दीपाली बारस्कर यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस आघाडीकडून मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एकच अर्ज दाखल आहे.
मनसेच्या ४ नगरसेवकांनी आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर युतीच्या हालचाली एकदमच थंडावल्या. ९ अपक्षांपैकी ७ अपक्षही राष्ट्रवादी सोबत आहेत. दोन अपक्ष मात्र युतीबरोबरच राहिले आहेत.
सभा सुरू होताच प्रथम उमेदवारीअर्ज माघारी घेण्यासाठी काही वेळ दिला जाईल. नंतर हात वर करून दोन्ही पदांसाठी निवडणूक होईल. मागील निवडणुकीतील वादग्रस्तपणा लक्षात घेता, उद्याच्या सभेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय पिठासन अधिकारी संजीवकुमार यांनी घेतला आहे.
 पक्षनिहाय संख्याबळ
राष्ट्रवादी-१८, काँग्रेस-११, शिवसेना १८, भाजप-९, मनसे-४, अपक्ष-९. अपक्षांतील ७ जणांचा राष्ट्रवादीला पाठिंबा. मनसेसह आघाडीचे संख्याबळ ४०. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ-३५.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा