कोल्हापुरातील रिक्षांना ई-मीटर बसविण्याची अंतिम मुदत उद्या रविवारी संपणार आहे. या कालावधीत किती रिक्षांना मीटर बसते व किती रिक्षा त्यापासून वंचित राहतात हे महत्त्वाचे बनले आहे. दरम्यान रिक्षाचालकांना ई-मीटर देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत सुमारेअडीच हजार रिक्षांना ई-मीटर उपलब्ध झाले आहे. तर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची रिक्षाचालकांशी चर्चा झाली असून त्यांनी त्यांच्याकडून ई-मीटर बसविण्यासाठी आणखी काही दिवसाची सवलत मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.    
शहरातील रिक्षांना ई-मीटर बसविण्याबाबत मार्च महिन्यात व्यापक आंदोलन झाले होते. दहा दिवस रिक्षा व्यवसाय बंद ठेवण्यात आला होता. आंदोलनाची सांगता होताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांनी रिक्षाचालकांना ई-मीटर बसविण्यासाठी २५ टक्के अनुदान देण्याचे ठरविले होते. त्यानुसार रिक्षाचालकांना राजकीय नेते व रिक्षा कल्याण समिती यांच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार मीटर आत्तापर्यंत उपलब्ध झाली आहेत. शहरात परमीट असलेल्या सुमारे साडेतीन हजार रिक्षा आहेत. त्यामुळे उर्वरित एक हजार रिक्षांना उद्या एका दिवसामध्ये ई-मीटर उपलब्ध होणार का हे लक्षवेधी ठरले आहे.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी ई-मीटरबाबत चर्चा केली. ई-मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने आणखी काही कालावधी दिला जावा, अशी मागणी बाबा इंदुलकर, राजू जाधव, मोहन बागडी, चंद्रकांत भोसले आदी रिक्षाचालक प्रतिनिधींनी केली. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. अधिकाऱ्यांची भूमिका पाहता जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत सर्व रिक्षांना ई-मीटर कार्यान्वित होतील, असे मत बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केले. मात्र रिक्षाचालकांची अडवणूक केली गेल्यास अवैध प्रवासी वाहतूक, सहाआसनी रिक्षांचा वावर, हेल्मेटसक्ती आदी मुद्यांवरून प्रशासनाचीच अडवणूक केली जाईल, असा गर्भित इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा