पक्षश्रेष्ठींनी सोपविलेला नगराध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने उद्या शुक्रवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा देणार आहे. काही सहकारी सदस्यांनीच सहकार्याची भूमिका घेतली नसली तरी नव्या नगराध्यक्षांना माझे पूर्णत सहकार्य राहणार आहे. दहा महिन्याच्या कालावधीत जनहिताची अनेक कामे पूर्ण केल्याचे समाधान वाटते, असे मत नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दहा महिन्यांसाठी रत्नप्रभा भागवत यांची निवड झाली होती. त्यानंतर नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुप्रिया गोंदकर यांना तितकाच कालावधी प्राप्त झाला होता. सुमारे दहा महिन्याच्या कालावधीत मूळच्या शिक्षिका असलेल्या गोंदकर यांनी पालिकेच्या शाहू हायस्कूलचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व तेथील अडचणींचे निवारण व्हावे यासाठी विशेष समितीची स्थापना केली. सेवा ज्येष्ठता यादी करून मुख्याध्यापकांना सह्यांचे अधिकार देण्याचे उल्लेखनीय काम केले.
नगराध्यक्षपदाच्या कालावधीत कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, निवेदीता माने, अशोकराव आरगे, किशोरी आवाडे, अशोकराव जांभळे, उपनगराध्यक्ष संजय कांबळे, सुनिल पाटील, रिवद्र माने यांच्यासह सभापती, नगरसेवक, प्रशासन यांचे सहकार्य लाभले.
गोंदकर यांच्या कालावधीतील उल्लेखनीय कामे याप्रमाणे  नेहरुनगर येथील रखडलेल्या झोपडपट्टी बांधकामास प्रारंभ व जयभिमनगरातील पहिल्या टप्प्यातील कामकाज पूर्णत्वाकडे. नगरोत्थान योजनेतून रस्ते व सारण गटारींसाठी ७ कोटी रुपये खर्च. कर्मचारी व सेवानिवृत्तींना २१ कोटीची रक्कम अदा. सुजल निर्मल योजनेअंतर्गत ६ कोटीची पाणी पुरवठय़ाची कामे सुरु. वारणा नदी नळपाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर. राज्यस्तर व जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून १ कोटीचे अनुदान प्राप्त. नगरपरिषदेच्या शाळा, उद्याने याठिकाणी दारू पिणा-या लोकांना आळा घालण्यासाठी प्रयत्न. सुजल निर्मल योजनेसाठी २२ कोटीचे कर्ज मंजूर. वाढीव भागात भुयारी गटार ड्रेनेज योजनेसाठी ९८ कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सादर. कर्मचारी, मक्तेदार, शासकीय देणी यांची ४० कोटीची रक्कम आíथक नियोजनामुळे फक्त १० कोटीवर आणली.

Story img Loader