महापालिकेच्या शहर बस सेवेचे अस्तित्व आता उद्या (शुक्रवार) पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासमवेत मुंबईत मंत्रालयात होणाऱ्या बैठकीवर अवलंबून आहे. या बैठकीत किमान एसटी महामंडळाच्या जुन्या शहर बसस्थानकाची जागा मनपाला शहर बस वाहतुकीसाठी स्थानक म्हणून देण्याचा निर्णय व्हावा अशी ठेकेदार कंपनी प्रसन्न पर्पल यांची अपेक्षा आहे.
सध्याच्या जुन्या बसस्थानकामागेच ही जागा आहे. तिथूनच पुर्वी एसटी महामंडळाची शहर बस सेवा चालायची. आता ती बंद झाल्यावर महामंडळ ही जागा त्यांच्या मुक्कामी गाडय़ा ठेवण्यासाठी म्हणून वापरत असते. शहर बस सेवेसाठी मनपाने वाडिया पार्क क्रिडा संकुलातील क्रिकेटच्या मुख्य मैदानामागे असलेली (खो-खोच्या मैदानालगत) जागा जिल्हा क्रिडा संकुल समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती, मात्र त्यांनी तसेच पालकमंत्र्यांनीही त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या जागेसाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय शहरातील बेशिस्त वाहतुकीचाही प्रश्न त्यामुळे आमच्या गाडय़ांना अडथळा होतो असे कारण देत ठेकेदाराने उपस्थित केला आहे. रिक्षा कायदेशीर आहेत किंवा नाही याच्याशी आमचा संबध नाही, मात्र त्या शहर बस सेवेच्या सध्याच्या ताप्तुरत्या मुख्य स्थानकाजवळच उभ्या रहात असल्याने चालकांना त्याचा अडथळा होतो, त्यातून भांडणे होतात असे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे. या दोन्ही गोष्टींचा निर्णय होत नसल्याने कंपनीचा तोटा वाढत आहे, यास्तव १० एप्रिलपासून सेवा बंद करत असल्याची नोटीस कंपनीने मनपाला दिली होती. त्यावर मनपात बुधवारी महापौर, आयुक्त तसेच सर्व पदाधिकारी, संबधित अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली.
सेवा बंद करू नये, जागा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे महापौर, आयुक्तांनी कंपनीला सांगितले. तसेच पालकमंत्री पाचपुते यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाची जागा मिळावी यासाठी त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला असल्याचीही माहिती कंपनीला देण्यात आली. सेवा चांगलीच आहे, मनपा सर्व सहकार्य करेल, सेवा ३० किलोमीटरच्या परिघापर्यंत वाढवावी असेही महापौरांनी कंपनीला सुचवले. जागा व अन्य गोष्टींबाबत उद्या (शुक्रवार) मुंबईत बैठक होत आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली. कंपनीचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader