उद्योगपती शैलेश बाबरिया यांचा दोष नसताना गुन्ह्यात अडकवण्यात आले. त्याच्या निषेधार्थ उद्या (बुधवार) दुपारी १२ वाजता व्यापारी संघटनेने निषेध सभेचे आयोजन केले असून, मोर्चाने जाऊन पोलीस अधिका-यांना निवेदन देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
बनावट भाडेपट्टा तयार करून औद्योगिक वसाहतीची जागा बळकावली म्हणून व्यवस्थापक अण्णासाहेब वाडकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बाबरिया यांना अटक करण्यात आली. त्यासंदर्भात शहरातील व्यापा-यांची आज तातडीची बैठक घेतली. बैठकीस अडीचशेहून अधिक व्यापारी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीत गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. जागेचे भाव वाढल्याने काहींचा भूखंडावर डोळा आहे. त्यातून दबाव आणून गुन्हे दाखल केले जात आहेत. (स्व.) भरतभाई बाबरिया यांनी सन १९६५मध्ये येथे वसाहतीत भूखंड घेऊन सिमेंट पाइपचा कारखाना सुरू केला. त्यांनी १५ वर्षे वसाहतीचे अध्यक्षपद भूषविले. या काळात वसाहतीचा विकास झाला. बाबरिया यांनी काहीही खोटे केलेले नाही, भूखंड जप्तीविरुद्ध न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाबरिया यांच्याकडील भूखंड काढून घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत. कायदेशीर बाबींचा त्याकरिता आधार घेतला जात नाही. याविरुद्ध व्यापारी लढा देतील. लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना सर्व माहिती आहे. त्यांनी बाबरिया यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले.
भरत कुंकूलोळ यांनी प्रास्ताविक केले. या वेळी रमेश कोठारी, नारायणभाई पटेल, मुन्ना झवर, रमेश गुंदेचा, चंदलाल सावज, मनीष बाबरिया, सुधीर डबीर आदींची भाषणे झाली. आभार नीलेश बाबरिया यांनी मानले. नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नगर अर्बन बँकेचे संचालक दीपक दुग्गड, नगरसेवक कल्याण कुंकूलोळ, नितीन पिपाडा, अभिजित कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

Story img Loader