वातावरणातील उष्मा कमी होऊ लागला आहे. मराठवाडय़ाचे डोळे पावसाकडे लागले आहेत. पाऊस आला की, निवडणुकांचे पडघम वाजू लागतील. त्याच्या तयारीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे आजच काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही औरंगाबाद जिल्हा दुष्काळ पाहणी दौरा ठरला. वरकरणी मतदान यंत्रांची तपासणी आणि राहुलबाबांचा दौरा या दोन स्वतंत्र घटना असल्या, तरी त्याची संगती मात्र ‘चला, तयारीला लागा’ हाच संदेश देणारी आहे!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्य़ाचा दुष्काळी दौरा केला. मराठवाडय़ातील चार जिल्हे दुष्काळात अक्षरश: होरपळले. सर्वसामान्य माणूस पिचला. तहानलेल्या मराठवाडय़ात २ हजार ३१८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अटी शिथील केल्याने जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या. दुष्काळातील विविध उपाययोजनांची माहिती करून घेण्यासाठी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या व्यक्तींनी भेटी दिल्या. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील पीकस्थितीची पाहणी केली. ग्रामीण भागातील अवस्था जाणून घेतल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना करायच्या या विषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार ७७८ कोटींची तरतूदही खरीप हंगामासाठी मंजूर झाली. त्यानंतर पवार यांच्या भेटीमुळे केंद्राची मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला. या प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही आपत्ती नियमन कायद्यान्वये अधिक मदत कशी मिळू शकेल यासाठी प्रयत्न करीत होते. बीड येथील दौऱ्यात त्यांनी तशी कागदपत्रे माध्यमांच्या प्रतिनिधींना आवर्जून दाखविली होती. उस्मानाबाद, जालना, बीड व नुकताच औरंगाबाद जिल्ह्य़ाचाही त्यांनी दौरा केला. दिलेल्या निधीतून करण्यात आलेल्या योजनांचे उद्घाटन करीत श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही जालना जिल्ह्य़ात चारा छावण्यांची पाहणी केली. जळालेल्या फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांबरोबर भोजन घेतले. पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याचा दुष्काळग्रस्त भागात दौरा होईल, अशी चर्चा होती. चार दिवसांपूर्वी राहुलबाबा जालना दौऱ्यावर येतील, असे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात होते. मात्र, तो दौरा झाला नाही. सोमवारी दुपारी राहुल गांधी औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेची कामे, चारा छावण्या व सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामाची ते पाहणी करतील. औरंगाबाद शहरातील हर्सूल तलावाची पाहणीही ते करणार असल्याचे संभाव्य दौऱ्यात नमूद केले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणाही तयारीला लागल्या आहेत.
दरम्यान, दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेत्यांचे दौरे उशिराने सुरू झाले आहेत. त्याच वेळी प्रशासकीय पातळीवर लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नेहमीप्रमाणे मतदान यंत्रांच्या तपासणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रांची तपासणी केली. ईसीआयएल कंपनीला मतदान यंत्रणांच्या तपासणीचे काम दिले असून, १० हजार मतदान यंत्रांची तपासणी व दुरुस्ती सुरू करण्यात आली. हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे एन. व्ही. सुब्बाराव, व्ही. कुमारस्वामी, एम. बालराज, डी. विजय श्रीनाथ, एम. करुणाकरन, एम. डी. अफसर, आदींचा या पथकात समावेश आहे. ज्या यंत्रात दोष आहे, त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या पथकाला मदत करण्यासाठी आयटीआयमधील १६ कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर बोलविण्यात आले आहे. नव्याने मतदारांची नोंदणीही केली जात असून, मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांचे छायाचित्र घेतले जाणार आहे. स्थलांतर, मृत मतदार व चुकीचा पत्ता वगळण्याचे कामही निवडणूक विभागाने हाती घेतले आहे.

Story img Loader