भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतक ऱ्यांच्या कार्याचाही गौरव व्हावा, शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळावी, या हेतूने दूरदर्शन वाहिनीकडून ‘सह्याद्री कृषी सन्मान सोहळ्या’चे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा जोरदार साजरा केला जाणार असून दूरदर्शनच्या स्टुडिओत रंगणाऱ्या या सोहळ्याला पहिल्यांदाच व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘कृषी सन्मान सोहळा’ आयोजित करणारी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी ठरली असून यंदा पुरस्कारांचे सहावे वर्ष आहे, अशा शब्दांत दूरदर्शन सह्याद्रीचे अपर महानिदेशक मुकेश शर्मा यांनी या सोहळ्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी संस्था आणि कृषी संशोधक यांचा गौरव करणारा हा सोहळा १३ फेब्रुवारी २०१३ रोजी रविंद्र नाटय़मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे कृषी व पणन विभागाचे मुख्य सचिव डॉ. सुधीर कुमार गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी जल व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अमहदनगर येथील विश्वनाथ तात्यासाहेब पाटील, कृषी क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी अकोल्याचे ईयन सतीशकुमार सिंग, कृषी क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवणारे परभणीचे विजय रामदास चव्हाण आणि अकोल्याच्या कल्याणी अनिल सोनोने तर ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगासाठी योगदान देणाऱ्या रंगनाथराव परसरामजी कदम यांना कृषी सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे.

Story img Loader