नक्षल चळवळीत सक्रीय राहिलेल्या व कालांतराने मन परिवर्तनानंतर आत्मसमर्पण करणाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने उद्या, मंगळवारी ११ जूनला आयोजित केला आहे. या मेळाव्यात जहाल नक्षलवादी म्हणून ओळख असलेल्या  व आता आत्मसमर्पणानंतर सर्वसामान्य आयुष्य     जगणाऱ्या  जीवन  याचा विवाह सोहळाही आहे.   देशात प्रथमच अशा पध्दतीने आत्मसमर्पितांचा मेळावा होत आहे.
लगतच्या गडचिरोली जिल्हय़ात सलग ३२ वर्षांपासून नक्षलवादी चळवळ सक्रिय आहे. या काळात नक्षलवाद्यांची कार्यप्रणाली व तत्व पटली नाहीत म्हणून अनेकांनी आयुष्याच्या संध्याकाळी का होईना मन परिवर्तन झाल्यानंतर या चळवळीला कायमचा रामराम ठोकला आहे. यासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ पदरी पाडून घेण्यासाठी अनेकांनी ही चळवळ सोडून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगणे पसंत केले आहेत.
गेल्या तीस वर्षांत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. हे सर्व आत्मसमर्पित इतरत्र विखुरलेले असून, त्यांना एकत्र आणून स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्याची कल्पना गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना सुचली. आता या दोन वरिष्ठ     अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने उद्या मंगळवार ११ जून रोजी स्नेहमिलन   मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   गडचिरोली जिल्हा पोलिस  मुख्यालयात     सकाळी ११.३० वाजता आयोजित या    मेळाव्याला    आजवरच्या    सर्व    आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना    निमंत्रित    करण्यात    आले    आहे.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जीवन या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा विवाह लावून देण्यात येणार आहे. जीवन हा सलग बारा वष्रे नक्षलवादी चळवळीत सक्रीय होता. जहाल नक्षलवादी म्हणून गडचिरोलीच्या जंगलात ओळख निर्माण केल्यानंतर अचानक एके दिवशी त्याला नक्षलवाद्यांचे विचार पटले नाहीत. आदिवासी भागात राहून आपल्याच आदिवासी बांधवांचा गळा कापायचा, त्यांना रात्री बेरात्री मारहाण करायची, त्रास द्यायचा या सर्व किळसवाण्या प्रकाराला तो कंटाळला होता. दलम मधील महिलांवर शारीरिक अत्याचार, मानसिक त्रास, जंगलात शेकडो मैल पायी चालणे यानंतर दलम कमांडरचे अत्याचार या सर्वाला कंटाळलेल्या जीवनने काही दिवसांपूर्वीच आत्मसमर्पण केले. या जीवनचे त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्याचा निर्णय गडचिरोली पोलीस दलाने घेतला आहे. नक्षलग्रस्त भागात अशा प्रकारचा मेळाव्याचे पहिल्यांदाच आयोजन केले जात असून यावेळी आत्मसमर्पीतांना मेळाव्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
राज्य व केंद्र शासनाने नुकतेच आत्मसमर्पितांना अनेक शासकीय लाभ देण्याचे जाहीर केले होते. आत्मसमर्पितांचा मेळावा पहिल्यांदाच होत असल्याने तिकडे नक्षलवादी सुध्दा चक्रावले आहेत. एकेक सदस्य चळवळ सोडून निघून जात असल्याने नक्षलवाद्यांनी सुध्दा शासनाच्या या योजना फसव्या असल्याचा प्रचार सुरू केला होता. मात्र आता प्रत्यक्ष आत्मसमर्पण करणारे नक्षलवादीच या योजनांची माहिती सहकाऱ्यांना देणार आहेत.

Story img Loader