यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत २ जूनला झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या, बुधवारी होत असून कोण बाजी मारणार या बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर आणि भाजपचे मदन येरावार यांच्यातच प्रमुख लढत असून पोटनिवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर मतदारांचा कौल अजमावण्याची संधी चालून आली असून मतदानाची टक्केवारी एकदमच कमी असल्याने निकालाची समीकरणे बदलण्याची अपेक्षा भाजपला आहे. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी पारवेकरांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे.
यवतमाळची पोटनिवडणूक भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे मुरब्बी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची शक्तिपरीक्षा समजली जाते. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून स्थानिक अनेक पातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली. भाजपतर्फे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि अनेक आजी-माजी आमदारांनी काँग्रेसच्या धोरणांना लक्ष्य बनवून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.
धामणगाव मार्गावरील महिला शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी निवडणूक यंत्रणेने केली आहे.
यवतमाळच्या इतिहासात कधीच नव्हे ते कमी मतदान यावेळी झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ५२.५ टक्के मतदान झाले होते मात्र यावेळी फक्त ३७.५० टक्के इतके कमी मतदान झाले त्यातही शहरी भागातील मतदानाचे प्रमाण तर अत्यल्प म्हणजे२२ ते २४ टक्के झाले आहे. उलट ग्रामीण आणि झोपडपट्टी भागात ५२ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या या कमी टक्केवारीमुळे राजकीय पक्षच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही अंतर्मुख झाले आहेत.
कडक उन्हाळयाचे दिवस, लग्नसराईचा मोसम , राजकीय पक्षांची उदासीनता, पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला मिळणारा फक्त एक वर्षांचा कार्यकाल त्यामुळे उमेदवारांचीही उदासीनता अशा विविध कारणांमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची प्रतिक्रिया आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केली. यावेळी ३ लाख २० हजार २१२ नागरिकांना मताधिकार होता. मात्र प्रत्यक्षात फक्त ३७.५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणूक निकालाची उत्सुकता आज संपणार
यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत २ जूनला झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या, बुधवारी होत असून कोण बाजी मारणार या बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
First published on: 05-06-2013 at 08:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today the result of yavatmal sub elections