दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश अक्षरश: स्तब्ध आणि नि:शब्द झाला. या आणि त्यानंतर पुढे आलेल्या अनेक प्रकरणांनंतर महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या घटना या सगळ्याच प्रकरणाला मोठय़ा प्रमाणात वाचा फुटली. स्त्रियांची सुरक्षा, त्यासाठीचे उपाय, कायदेकानू यावर मोठमोठय़ा चर्चाही झाल्या. पण या सगळ्याच चर्चामध्ये लैंगिक शिक्षण हा मुद्दा कुठेच उपस्थित झाला नाही. कोणीही या मुद्दय़ावर भाष्य केलं नाही. अशा वेळी मनोरंजनाच्या माध्यमातून रवी जाधवने दिग्दर्शित केलेला ‘बीपी’ अर्थात ‘बालक-पालक’ हा चित्रपट सेक्स एज्युकेशनच्या गरजेवर प्रकाश टाकतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तुंग ठाकूर आणि रितेश देशमुख या दोघांनी निर्माता म्हणून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आहे. त्यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आहे, असं म्हणावं लागेल. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या दोन चित्रपटांचा यशस्वी दिग्दर्शक रवी जाधवच्या हाती आपल्या चित्रपटाची सूत्रं देऊन त्यांनी खूपच चांगला निर्णय घेतला आहे.
एका ओळीत चित्रपटाची कथा सांगायची झाली, तर वयात येताना मुलांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं पालकांनीच द्यायला हवीत. त्यासाठी सेक्स एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. पण ही कथा चित्रपटात मांडताना अंबर हडप, गणेश पंडित आणि रवी जाधव यांनी त्यावर खूपच चांगले संस्कार केले आहेत.
ही गोष्ट आहे एकाच वर्गात असलेल्या आणि एकाच चाळीत राहणाऱ्या चार मुलांची. अव्या (रोहित फाळके), भाग्या (मदन देवधर), चिऊ (भाग्यश्री संकपाळ) आणि डॉली (शहावती पिंपळीकर) हे चौघंही एकमेकांचे अगदी घनिष्ठ मित्र. एक दिवस त्यांच्या चाळीतली एक मुलगी चाळ सोडून निघून जाते. त्या मुलीनं काहीतरी ‘शेण खाल्ल्याने’ तिच्यावर ही वेळ आल्याचं या मुलांच्या कानावर येतं. मग ‘शेण खाणं’ म्हणजे काय, असा प्रश्न मुलांना पडतो. ती मुलं सर्वप्रथम आईबाबांना हा प्रश्न विचारतात. पण त्यांच्याकडून काही उत्तर मिळण्यापेक्षा मौन आणि ओरडाच मिळतो. त्यामुळे या मुलांचं कुतूहल वाढतं. चौघंही आपापल्या परीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.
यासाठी त्यांना मदतीची गरज भासते आणि ते त्यांच्याच वर्गातल्या वाया गेलेल्या विशू (प्रथमेश परब) या मुलाकडे जातात. मुलीनं शेण खाल्लं हे ऐकून विशू त्यांना थेट ही ‘ढिंच्यॅक ढिंच्यॅक’वाली भानगड असल्याचं सांगतो. मग ‘ढिंच्यॅक ढिंच्यॅक’ हे काय, हे कळण्यासाठी त्यांना काही अश्लील मासिकंही देतो. ही मासिकं वाचून कुतूहल चाळवलेल्या मुलांची दुसरी पायरी असते अश्लील चित्रफिती पाहणं. त्यासाठी ही मुलं पैसे गोळा करून व्हीसीआर आणि कॅसेट्स आणतात. ती ब्लू फिल्म पाहिल्यानंतर त्यांचं नातं एकदम बदलून जातं. आतापर्यंत चाळीतल्या नेहा ताईकडे (सई ताम्हणकर) ताईच्या नजरेनं बघणारा भाग्या ती ‘आयटम’ असल्याचा शेरा मारतो. मुलांच्या वागण्यातला हा बदल चाळीतल्या कदम काकांच्या (किशोर कदम) डोळ्यात येतो. पण पुढे काय होतं, त्या मुलांची मैत्री टिकते का, आपलं कुतूहल आणखी शमवण्यासाठी ते काय करतात, यासाठीच नाही, तर अनेक गोष्टींसाठी ‘बीपी’ पाहणं खूप आवश्यक आहे.
रवी जाधवने चित्रपटाची मांडणी फ्लॅशबॅक पद्धतीने केली आहे. अव्या आणि डॉलीचं लग्न झालंय आणि त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाच्या खोलीत त्यांना पॉर्नोग्राफिक फिल्मच्या सीडीज सापडतात. तिथून हा चित्रपट सुरू होतो आणि थेट २७-२८ र्वष मागे जातो. १९८५च्या सुमारासचा काळ रेखाटताना रवी आणि त्याच्या टीमने खूपच चांगली मेहनत घेतली आहे. व्हीसीआर पार्लर, मुलांचे कपडे, चाळीत पडद्यावर दाखवण्यात येणारा चित्रपट या सगळ्यांतून तो काळ चांगल्या पद्धतीने रेखाटला आहे. त्याचप्रमाणे त्या काळाबरहुकूम प्रकाशयोजनाही करण्यात आली आहे. खुद्द रवी जाधव हा जाहिरात क्षेत्रातला असल्याने त्याची प्रत्येक फ्रेम खूप बोलकी असते. रवी आणि छायाचित्रकार महेश लिमये या दोघांचं टय़ुनिंग अतिशय उत्तम जमल्यामुळं चित्रपट अत्यंत सुंदर झाला आहे. अनेक फ्रेम्स तर दाद घेऊन जातात. मुख्य म्हणजे चित्रपट अत्यंत प्रवाही आहे. तो कुठेच रेंगाळत नाही.
संपूर्ण चित्रपटात रवीची कल्पक दिग्दर्शकाची नजर जाणवते. अश्लील चित्रपट पाहण्याआधी प्रसाद म्हणून केळं सहज स्वीकारणारी चिऊ तो चित्रपट पाहिल्यानंतर त्या केळ्याकडे पाहून हडबडते. किंवा, चाळीच्या व्हरांडय़ात उभं राहून दात घासणारे आणि अंगणात पच्कन थुंकणारे काका अनवधानाने या मुलांनी केलेल्या किल्ल्यावर थुंकायचा प्रयत्न करतात. त्या वेळी अव्या त्यांना ‘महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना तरी सोडा काका’ असं म्हणतो. तिथे रवीची कल्पक नजर दिसते. त्याशिवाय अव्याचं चिऊकडे पाहून स्वप्न पाहणं, काचेच्या तुकडय़ाने चिऊच्या चेहऱ्यावर कवडसे टाकणं, कॅसेट पाहताना सर्वात आधी पडदा बंद करणं, या सगळ्याच गोष्टींमध्ये दिग्दर्शक भाव खाऊन गेला आहे.
चित्रपटाचं संगीत व पाश्र्वसंगीत खूपच चांगलं झालं आहे. या चित्रपटाद्वारे विशाल-शेखर या हिंदीतल्या संगीतकारांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला संगीत दिलं आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेलं ‘कल्ला’ हे गाणं तरुणाईत नक्कीच कल्ला करेल. त्याचबरोबर काही छोटीछोटी गाणीही खूपच बोलून जातात. पाश्र्वसंगीताच्या बाबतीत तर चिनार-महेश या दोघांनी कमाल केली आहे. सेक्स किंवा त्याबद्दल विशू बोलायला लागल्यानंतर आपसूकच मागे वाजणारा तानपुरा झक्कास जमला आहे.
अभिनयाच्या बाबतीत तर या चित्रपटाला शंभरपैकी एक हजार मार्क आहेत. रवी, रितेश आणि उत्तुंग या तिघांचं कौतुक याच गोष्टीसाठी करावंसं वाटतं की, चित्रपटात एकही स्टार नसताना त्यांनी या पाच लहान मुलांवर व कथानकावर विश्वास टाकून एवढं मोठं पाऊल उचललं. अव्या, भाग्या, चिऊ, डॉली आणि विशू या पाचही जणांनी चांगल्या अर्थाने अभिनयाचे तारे तोडले आहेत. ही मुलं कॅमेऱ्यासमोर अत्यंत सहजपणे वावरतात. प्रथमेश परब याचा वावर तर एखाद्या सुपरस्टारला लाजवेल एवढा सहज आहे. त्याशिवाय रोहित, मदन, शहावती आणि भाग्यश्री हे चौघंही कमालीच्या सहजपणे कॅमेऱ्याला सामोरे गेले आहेत. या पाच जणांच्या भक्कम अभिनयावर हा चित्रपट कमालीचा उभा राहतो. त्याशिवाय किशोर कदम, सई ताम्हणकर, आनंद इंगळे (भाग्याचे बाबा), अविनाश नारकर (अव्याचे बाबा), सुबोध भावे (मोठेपणीचा अव्या) आणि अमृता सुभाष (मोठेपणीची डॉली) यांनीही खूप सहजसुंदर अभिनयाचा प्रत्यय दिला आहे.
चित्रपटाच्या शेवटी मोठा झालेला अव्या म्हणतो की, यांच्यातल्या विशूचा शोध घ्यायला हवा. त्या वेळी मोठी झालेली डॉली त्याला समजावते की, यांचा विशू चोवीस तास यांच्याबरोबर असतो. मोबाइल, कॉम्प्युटर, इंटरनेटच्या माध्यमातून! प्रश्न आहे, तो पालकांनी मुलांबरोबर संवाद साधण्याचा. रवी, अंबर, गणेश, रितेश आणि उत्तुंग यांनाही हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो पोहोचला आणि घराघरांत बालक-पालक यांच्यातला संवाद वाढला, तर आणि तरच हा चित्रपट यशस्वी झाला असं म्हणता येईल.

‘बीपी’ अर्थात ‘बालक-पालक’
निर्माता – उत्तुंग ठाकूर व रितेश देशमुख
दिग्दर्शक – रवी जाधव
कथा – अंबर हडप व गणेश पंडित
संवाद – अंबर हडप, गणेश पंडित आणि रवी जाधव
संगीत – विशाल-शेखर
पाश्र्वसंगीत – चिनार-महेश
छायांकन – महेश लिमये
कलाकार – रोहित फाळके, मदन देवधर, प्रथमेश परब, भाग्यश्री संकपाळ, शहावती पिंपळीकर, सई ताम्हणकर, किशोर कदम व इतर

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
maharashtra election 2024 mahim vidhan sabha sada sarvankar viral video
VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”