कोल्हापुरात टोलची आकारणी शनिवारी मध्यरात्रीपासून होणार नाही, याबाबत बांधकाम राज्यमंत्र्यांसमवेत टोलविरोधी कृती समितीची बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी टोलविरोधी कृती समितीने शनिवारी रात्री शिरोली टोल नाका येथे मानवी साखळी उभारण्याचे उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर शहरामध्ये अंतर्गत रस्त्यांचे काम आयआरबी कंपनीने केले आहे. या कंपनीच्या वतीने शनिवारी मध्यरात्रीपासून टोलआकारणी केली जाणार असे सांगितले, जात होते. या पाश्र्वभूमीवर टोलविरोधी कृती समितीने आयआरबी कंपनी व राज्य शासनाविरुद्धचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचे ठरवले आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना उपस्थित केला. तेव्हा ते म्हणाले, शनिवारी मध्यरात्रीपासून टोलआकारणी करावी, असा कोणताही आदेश शासनाने आयआरबी कंपनीला दिलेला नाही. याबाबत माझी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. टोलविरोधी कृती समितीने टोलआकारणी करण्यापूर्वी शासनाकडे एक बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती.
ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, कॉ. गोविंद पानसरे, प्रतापसिंह जाधव यांच्यासह काही आमदारांनी राज्य शासनाशी संपर्क साधला होता. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना टोलविरोधी कृती समितीसमोर बैठक घेण्याची सूचना केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील पाहणीसाठी राहुल गांधी यांचा सोमवारी राज्याचा दौरा आहे. तो संपल्यानंतर मंत्री क्षीरसागर हे संयुक्त बैठकीची तारीख ठरवतील. त्यानुसार कृती समितीसमवेत बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीस मी स्वत:ही उपस्थित राहणार आहे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
दरम्यान, टोलआकारणी विरोधातील टोलविरोधी कृती समितीचे आंदोलन सुरूच राहणार आहे.पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगेचच टोलआकारणी होणार नाही. कृती समितीसमवेत संयुक्त बैठक झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर कृती समितीची आंदोलनात्मक भूमिका काय राहणार असे विचारले असता बाबा इंदुलकर म्हणाले, कृती समितीने आंदोलनाची केलेली तयारी पाहून शासन घाबरले आहे. त्यांनी नमते घेऊनच ही भूमिका घेतली आहे. शिवाय पालकमंत्री पाटील यांचा इतिहास पाहता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास कृती समितीची तयारी नाही. शनिवारी रात्री शिरोली नाक्यावर कृती समितीचे ठरलेले आंदोलन होणार आहे. त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचा संदेश अधिकृतरीत्या पोहोचवला तर फेरविचार केला जाईल.
कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
कोल्हापुरात टोलची आकारणी शनिवारी मध्यरात्रीपासून होणार नाही, याबाबत बांधकाम राज्यमंत्र्यांसमवेत टोलविरोधी कृती समितीची बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
First published on: 26-05-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll assessment of kolhapur is after committee discussion harshvardhan patil