आयआरबी कंपनीने बनविलेल्या रस्ते प्रकल्पातील कामांचा दर्जा निकृष्ट असून कामही अपुरे आहे. तरीही पोलीस बंदोबस्तात सुरू असलेली टोल वसुली म्हणजे खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. आयआरबीने राबविलेल्या रस्ते विकास प्रकल्पाची क्वॉलिटी कंट्रोलच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन १७ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे होणार आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची रणनीती या अधिवेशनात ठरविली जाणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रा.कवाडे आज येथे आले होते. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याची मागणी रास्त असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, कोल्हापूरच्या मागणीला शह देण्यासाठी पुणे येथे खंडपीठ स्थापन होण्याच्या मागणीचे पिल्लू सोडले जात आहे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू करण्याचे गाजर दाखवून खंडपीठ टाळण्याचा प्रयत्न शासनाने करू नये.     
 पुण्यातील जर्मन बेकरी, नरेंद्र मोदी यांची पाटण्यातील सभा, मुंबईतील मालिका या सर्व बॉम्बस्फोटातील आरोपी पोलिसांच्या हाती लागतात. याकडे लक्ष वेधून प्रा.कवाडे यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे हल्लेखोर अद्यापही कसे पकडले जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या खुनाचे आरोपी कोण आहेत हे शासनाला माहीत असूनही जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. डॉ. दाभोलकर यांचा खून व बुध्दगया येथील बॉम्बस्फोट यांचा तपास करण्यास शासन दिरंगाई करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.    
शेतक-यांना कर्जमाफी देण्याऐवजी शासनाने आपण बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वस्त केले पाहिजे. अस्मानी, सुलतानी, सावकारी अशा सर्व संकटाच्या वेळी शासनाने शेतक-यांना धीर दिला तर त्यांच्या आत्महत्या, दैन्य दूर होईल, असे त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना व्यक्त केले. खैरलांजी हत्याकांडानंतर दलितांवरील अत्याचार कमी होण्याऐवजी ते वाढत चालले असल्याचे केंद्रीय अनुसूचित आयोगाच्या अहवालातून उघड झाले आहे. दलितांच्या प्रश्नांकडे शासन गंभीरपणे पाहत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Story img Loader