सांगली-इस्लामपूर मार्गावर टोल वसुली रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी कृती समितीने पुकारलेल्या बंदला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. एन.डी.पाटील यांनी टोल नाक्यावर सुरू असलेल्या सर्वपक्षीय धरणे आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. याचवेळी कार्यकर्त्यांनी टोलनाका उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने रोखला गेला.
सांगली-इस्लामपूर आयर्वनि पुलाला पर्यायी पुलाची उभारणी बांधकाम विभागाने खासगीकरणातून केली आहे. कंपनीकडून त्यासाठी सांगलीवाडी येथे टोलवसुली करण्यात येत असून शासनाने ही टोलवसुली जुल २०१३ मध्ये बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयीन बाब लक्षात घेऊन हा आदेश शासनाने तत्काळ मागे घेतला. कोल्हापूर येथील खासगीकरणातून करण्यात आलेल्या विकास कामांबाबत आकारण्यात येत असलेला टोल रद्द होऊ शकतो, त्यामुळे सांगलीतील चालू असणारी बेकायदेशीर टोल वसुली रद्द करण्यासाठी सर्वच पक्ष कृती समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र आले आहेत. वाहतूकदार संघटनेचे बापूसाहेब पाटील हे या समितीचे अध्यक्ष तर उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर निमंत्रक आहेत.
कृती समितीने गेले पाच दिवस टोल हटाव आंदोलन हाती घेतले असून बुधवारी सांगली बंदची हाक दिली होती. यामुळे शहरातील बाजारपेठ, उपाहारगृहे, पानपट्टी व्यवसाय बंद होते. गांधी पुतळयापासून कृती समितीने शहराच्या मुख्य मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढून टोलहटावची मागणी करीत जनजागृती केली. यामध्ये कृती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, निमंत्रक प्रशांत पाटील-मजलेकर, माजी आ. नितीन िशदे, सतिश साखळकर, सुनील पट्टणशेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकत्रे सहभागी झाले होते. रॅलीची सांगता सांगलीवाडी टोल नाक्यावर धरणे आंदोलनाने झाली.
धरणे आंदोलनात प्रा. एन.डी.पाटील यांनी सहभाग नोंदविला. या वेळी महापौर श्रीमती कांचन कांबळे याही सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांना उद्देशून बोलताना प्रा. एन.डी.पाटील यांनी सांगितले की, आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मंत्री व आमदारांच्या घरावर मोच्रे काढण्याची वेळ आली तरी कार्यकर्त्यांनी मागे हटू नये. कोणत्याही स्थितीत टोल नाक्याचा कार्यक्रम केल्याशिवाय अन्यायी टोलवसुली रद्द होणार नाही.
या वेळी आंदोलकांनी टोलनाका उद्ध्वस्त करण्यासाठी चाल केली. मात्र बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी या कृत्यापासून कार्यकर्त्यांना परावृत्त केले.
दरम्यान, टोल वसुलीवरून उद्धभवणाऱ्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपेंद्रसिह कुशवाह यांनी रात्री उशिरा कृती समितीची बठक बोलावली होती. या बठकीस केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील,उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील, कृती समितीचे महेश पाटील, महापौर श्रीमती कांबळे, उपमहापौर मजलेकर, सतिश साखळकर, नितीन िशदे आदींसह पोलीस अधीक्षक दिलीप सावंत उपस्थित होते.
टोलविरोधी बंदला सांगलीत प्रतिसाद
सांगली-इस्लामपूर मार्गावर टोल वसुली रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी कृती समितीने पुकारलेल्या बंदला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
First published on: 23-01-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll collection n d patil sangli islampur road cancelled