पुणे ते गुजरात व्हाया बदलापूर
मोनो, मेट्रो या अत्याधुनिक दळणवळणांच्या साधनांपासून ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना अद्याप वंचित ठेवणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र कल्याणपल्याडच्या रहिवाशांना किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवडय़ात एमएमआरडीएने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग जोडणाऱ्या शिरसाड फाटा ते बदलापूर या ३७ किलोमीटरच्या चौपदरी रस्त्याला मंजुरी दिली. विशेष म्हणजे ७८० कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता ‘टोल फ्री’ असणार आहे.
वाडा-शिरसाड फाटा ते पडघा, खडवली, गुरवली, आपटी-जांभुळमार्गे हा रस्ता बदलापूरला जोडला जाणार आहे. कल्याण तालुक्यातील ३५ गावांना या रस्त्याचा फायदा होईल. या रस्त्यासाठी खडवली, गुरवली येथे रेल्वे मार्गावर तर भातसा (राया), काळू (उतणे) आणि उल्हास (आपटी) या नद्यांवर पूल उभारले जाणार आहेत. २० जूनला या कामाची निविदा निघाली असून येत्या दीड वर्षांत रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे सध्या उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कारण पुण्याहून येणारी अवजड वाहने परस्पर बदलापूरमार्गे गुजरातकडे जाऊ शकतील. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होऊ शकेल.

बदलापूर स्थानकात उड्डाणपूल
या व्यतिरिक्त बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जत दिशेला पूर्व पश्चिम दिशांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे कामही एमएमआरडीएने मंजूर केले आहे. विशेष या पुलाचा सर्व खर्च एमएमआरडीए करणार आहे. बराच काळ रखडलेला बदलापूर स्थानकातील कल्याण दिशेचा उड्डाण पूल काही महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाला आहे. मात्र बदलापूरची झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पूर्व पश्चिम विभागांना जोडणारा हा एकमेव पूल अपुरा आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या दुसऱ्या पुलाचे काम वेळेत मार्गी लागावे, अशी अपेक्षा बदलापूरकर व्यक्त करीत आहेत.