‘टोलनाक्यांवर पैसे मागणाऱ्यांना तुडवा’, या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री उशिरापासून सुरू केलेले ‘टोलफोड’ आंदोलन प्रवासी आणि वाहनचालकांसाठी कमालीचे तापदायक ठरले. सोमवार सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत मुलुंड, ऐरोली, घोडबंदर, दहिसर टोलनाक्यांवर आंदोलन करत या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या जवळपास प्रत्येक टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसून येत होत्या. विशेष म्हणजे, टोल बंद करा, या मागणीसाठी आक्रमक होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळताच अवघ्या काही मिनिटांतच सर्व टोलनाक्यांवरील वसुली पूर्ववत झाली. त्यामुळे मनसेचे हे ‘खळ्ळ््खटय़ाक’ नाटय़ काही तासांपुरतेच रंगल्याचे पाहावयास मिळाले.
नवी मुंबईत रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टोल भरू नका आणि टोल मागणाऱ्यांना तुडवून काढा, असे आवाहन केले. त्यानंतर काही तासांतच ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांच्या दिशेने धाव घेतली. रविवारी रात्रीच ऐरोलीतील टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. हे आंदोलन चिघळणार हे स्पष्ट असतानाही सकाळी मुंबईच्या वेशीवर असलेल्या टोलनाक्यांवर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नव्हता. रात्री उशिरा मुलुंड चेक नाका, आनंदनगर, घोडबंदर, अशा मुख्य टोलनाक्यांवर जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याची संधी मिळाली. काही कार्यकर्त्यांनी आनंदनगर आणि घोडबंदर टोलनाक्यांवर हल्ला चढविला. या दोन्ही टोलनाक्यांची तोडफोड करत टोलवसुली थांबविण्यात आली. अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे टोलनाक्यांवरील कर्मचारी भेदरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टोलनाक्यांवर बंदोबस्त वाढविला. पोलिसांचे संरक्षण मिळताच टोलनाक्यांवर पुन्हा टोल वसुली सुरू झाली. रविवारी टोलनाक्यांवर हल्ला चढविल्यानंतरही पुन्हा वसुली सुरू झाल्यामुळे सोमवारी कार्यकर्त्यांनी पुन्हा टोलनाक्यांवर हल्ला चढवून टोलवसुली बंद करण्याचा प्रयत्न केला. ऐन गर्दीच्या वेळेत मनसेच्या या आंदोलनामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. मुंबईच्या वेशीवर असलेल्या टोलनाक्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. मुलुंड, दहिसर या टोलनाक्यांवर सकाळ, सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवास नकोसा होत असतो. असे असताना मनसेच्या आंदोलनामुळे ही कोंडी वाढली आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागले. दरम्यान, आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेताच नाक्यांवरील वसुली मात्र पूर्ववत झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा