सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या बायपास पुलावरील टोल हटविण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केली. टोल हटावसाठी गेले ११ दिवस सुरू असणारे सर्वपक्षीय आंदोलन लेखी आदेश मिळेपर्यंत चालूच राहणार असल्याचे कृती समितीचे निमंत्रक उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी सांगितले.
धवारी मुंबईतील सह्य़ाद्री अतिथिगृहावर भुजबळ यांनी कृती समितीची बठक बोलावली होती. या बठकीस ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री आर.आर.पाटील, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, आ. संजय पाटील, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, जिल्हा सरकारी वकील सी.डी.माने आदींसह महापालिका आयुक्त अब्दुल अजीज कारचे आदी उपस्थित होते.
आयर्वनि पुलाला पर्याय म्हणून खासगीकरणातून बायपास रोडसह स्वतंत्र पूल उभारून त्याच्या खर्चापोटी अशोका बिल्डकॉनला टोल वसुलीस शासनाने मान्यता दिली होती. ही टोल वसुली अन्यायी आहे, अशी भूमिका घेत सर्व पक्षीय कृती समितीच्या माध्यमातून गेले ११ दिवस टोल नाक्यावर टोल हटाव आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत बांधकाम मंत्री भुजबळ यांनी विशेष बठक बोलावली होती.
ठेकेदार कंपनीने जादा खर्चापोटी मागितलेल्या रकमेबाबत शासन व कंपनी यांच्यातील वाद वेगळ्या पातळीवर सोडविण्यात येईल. ठेकेदार कंपनीच्या मागणीबाबत न्यायालयात जायची शासनाची तयारी आहे. मात्र टोल वसुली तत्काळ रद्द करण्यात येत असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली. ठेकेदाराला वाढीव कामापोटी पसे द्यायचे की नाही? किती द्यायचे? याबाबतचा निर्णय शासन घेईल. मात्र टोलवसुली बंद करण्याचे निर्देष देण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले. या वेळी कृती समितीची बाजू जिल्हा सरकारी वकील सी.डी.माने यांनी बठकीत ठामपणे मांडली.
दरम्यान, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, टोल वसुलीचा निर्णय रद्द करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात कार्यवाही होईपर्यंत कृती समितीचे आंदोलन सुरूच राहील.
मदन पाटील युवा मंचाचे अध्यक्ष सतिश साखळकर हे आजही टोल नाक्यावर आंदोलनात सक्रिय आहेत. टोल नाका रद्द करण्यात येत असल्याची लेखी घोषणा होऊन प्रत्यक्षात वसुली नाका कार्यालयाला टाळे ठोकेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. अशोका बिल्डकॉनकडून अन्यायी टोलवसुली सुरू असल्याने ऑगस्टपासून युवा मंचाच्या माध्यमातून लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील टोल हटविणार
सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या बायपास पुलावरील टोल हटविण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केली.
First published on: 30-01-2014 at 03:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll will remove on the sangli islamapur road