‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ या गोंडस नावाखाली विदर्भाचे आंदोलन उभे करणाऱ्या नेत्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात असून सरकारचा कार्यकाळ संपत असताना ही उपरती झाल्याची टीका विदर्भवाद्यांकडून होऊ लागली आहे.
विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. मात्र मंत्र्यांच्या आश्वासनापलीकडे विदर्भाच्या जनेला काहीच मिळाले नाही. परंतु विदर्भातील नेत्यांनी विदर्भाच्या मुद्दय़ावरून स्वत:ची पोळी शेकली. काहीजण लोकसभेत खासदार म्हणून गेले तर काहींनी मंत्रीपद मिळवले. आता परत पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची मागणी थोडय़ा प्रमाणात पुढे येत असताना ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ या गोंडस नावाखाली विदर्भासाठी आंदोलन उभे करणाऱ्या नेत्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे करीत आहेत. वीज, पाणी, कोळसा, इत्यादी नैसर्गिक संपत्ती विदर्भात मोठय़ा प्रमाणात असून नागपुरात विधानभवन, राजभवन, रविभवन, आमदार निवास इत्यादी सर्व सोयी सवलती उपलब्ध आहेत. तरीही विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जात नाही, याबद्दल खेद व्यक्त करून आगामी निवडणूक समोर ठेवून ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’चा फार्स रचण्यात आल्याची टीका भारतीय रिपब्लिकन परिषदेचे शहराध्यक्ष असंघ रामटेके यांनी केली आहे.
सरकारचा कार्यकाळ संपत असताना विदर्भ अ‍ॅडव्हान्टेजचा फार्स रचण्यात आल्याचा आरोप भारतीय बोल्शेविक पार्टीचे सचिव कामगार नेते डॉ. शशिकांत वाईकर यांनी केला आहे. विदर्भात आधी मूलभूत सोयी उभारा, अशी सूचनाही त्यांनी केली
आहे.

Story img Loader