विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन वाढावे, या साठी समाजकल्याण विभागाकडून आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या टॉनिकच्या बाटल्या चक्क उकिरडय़ावर सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारकडून खर्चण्यात आलेले लाखो रुपये समाजकल्याण विभागाच्या ढिसाळपणामुळे थेट उकिरडय़ावर येऊन पडल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी वाटप केलेल्या टोनेक्स सिरप या टॉनिकच्या २५० बाटल्या कोणी तरी जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील उकिरडय़ात टाकल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. शहराच्या भीमनगर येथील नगरपालिका शाळा क्रमांक नऊच्या बाजूला या बाटल्या सापडल्या. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली. पुरविण्यात आलेला औषधींचा साठा बनावट असल्यामुळे ही औषधे उकिरडय़ावर टाकून दिली काय, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.
समाजकल्याण विभागाकडून आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत टॉनिकच्या बाटल्या पुरविल्या जातात. औषधी अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात या बाटल्या समाजकल्याण खात्याकडूनच पुरविल्या गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या विभागातील कर्मचाऱ्यांनी या बाटल्या उकिरडय़ावर फेकल्या की वाटप झालेल्या संस्थेकडून हा गरप्रकार झाला, हे स्पष्ट झाले नाही. तपासानंतरच या वर प्रकाश पडणार आहे. पुरवण्यात आलेल्या या बाटल्या वसतिगृह व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून मोफत देण्यात येतात. या औषधामुळे मुलांच्या शरीरातील लोह वाढण्यास मदत होतेच, शिवाय रक्ताचे प्रमाणही वाढते.
बाटल्या उकिरडय़ावर फेकल्याचा प्रकार नागरिकांनी औषधी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला. या औषधाची कालमर्यादा २०१५ पर्यंतची असून ही औषधे गेल्या काही दिवसांत विविध वसतिगृहांत विद्यार्थ्यांना दिली आहेत. मात्र, ती विद्यार्थ्यांना न देता चक्क उकिरडय़ात सापडल्याने हा प्रकार कोणी केला हे शोधण्याचे आव्हान औषधी अधिकाऱ्यांपुढे आहे. या बाटल्यांचा पंचनामा औषधी अधिकारी काळे यांनी करून सापडलेली औषधे जप्त केली. या औषधावरील बॅच नंबरवरून ही औषधे नेमकी कोणत्या संस्थेला दिली होती, याचा तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकार गंभीर असून यावर कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.
टॉनिकच्या बाटल्या उकिरडय़ावर!
विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन वाढावे, या साठी समाजकल्याण विभागाकडून आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या टॉनिकच्या बाटल्या चक्क उकिरडय़ावर सापडल्या आहेत.
First published on: 07-08-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tonic bottles in garbage