डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘गोपीनाथ मुंडे यांची सामाजिक न्यायातील भूमिका’ या विषयावर पीएच. डी.स मान्यता देऊनही राजकीय द्वेषापोटी हा विषय रद्द करावा, म्हणून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करीत माधव फड या विद्यार्थ्यांने विद्यापीठ प्रशासनाची तक्रार राज्यपाल तथा कुलपतींकडे केली आहे.
माधव फड या विद्यार्थ्यांने ३० जानेवारी २००९ रोजी ‘गोपीनाथ मुंडे यांची सामाजिक न्यायातील भूमिका’ या विषयावरील संशोधन आराखडा सादर केला. त्यास संशोधन व मान्यता समितीने ३० जुलै २००९ रोजी मान्यता दिली. उपस्थित असतानाही या विषयावर सादरीकरण नंतर घेतले जाईल, असे विद्यार्थ्यांला सांगितले गेले. त्यानंतर संशोधनावरील मौखिक परीक्षा घेतली जाईल, असेही कळविले. मात्र, परीक्षा घेतली नाही. मागील वर्षी नव्याने ‘पेट’मध्ये नोंदणी करा, असे कळविण्यात आले. हे संशोधन पूर्ण करण्यास माधव फड या विद्यार्थ्यांने मुंबई व नवी दिल्ली येथेही प्रवास केला. मुंडे यांच्या वेगवेगळ्या सभांना आवर्जून हजेरी लावली. तथापि, केवळ राजकीय द्वेषापोटी पीएच. डी. मिळू दिली जात नसल्याचा आरोप फड यांनी तक्रारीत केला आहे.
गेल्या ३ जानेवारीच्या नव्याने केलेल्या समितीत संशोधन आराखडय़ाला शून्य गुण दिले गेले. पूर्वी संशोधन पूर्ण झाले असतानाही केवळ मानसिक छळासाठी म्हणून ६०पैकी शून्य गुण कसे दिले, असा फड यांचा सवाल आहे.
या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. प्रत्येक अधिकारी त्यांना वेगवेगळी उत्तरे देत होता. काही वेळा लेखी स्वरुपातही अधिकाऱ्यांनी बरेच घोळ घालून ठेवले. शेवटचा पर्याय म्हणून फड यांनी राज्यपालांकडे तक्रार केली. संपूर्ण संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतरही हा विषयच रद्द करावा, यासाठी दबाव आणला जात आहे.
या पूर्वी याच विद्यापीठात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर प्रबंध सादर केलेल्या दोन विद्यार्थ्यांना पीएच. डी. देण्यात आली. मग मुंडे यांच्या सामाजिक विचारावर पीएच. डी.चे काम पूर्ण झाल्यावर विषय बदलण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल फड याने निवेदनाद्वारे केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा